Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना समोर आली असून, एकाच कुटुंबात आधी मुलाने आणि आता आईने आत्महत्या (Suicide) करुन आपले जीवन संपवले आहे. पैठण तालुक्यातील शिवनाई गावातील ही घटना असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकुलत्या एक 17 वर्षीय मुलाने अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र मुलाचा विरह सहन न झाल्याने आईनेही घरातील बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. रितेश रमेश काळे (वय 17 वर्षे, रा. शिवनाई, पैठण) असे मुलाचे तर रुखमनबाई रमेश काळे असे आत्महत्या करणाऱ्या आईचे नाव आहे.
पैठण तालुक्यातील शिवनाई येथील अकरावी वर्गात शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय शालेय विद्यार्थी रितेश रमेश काळे विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी (02 मार्च) गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रितेश काळे आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तर रितेशच्या आई रुखमनबाई रमेश काळे यांना आपल्या मुलाचे दुःख सहन न झाल्याने त्यांनी गुरुवारी (22 मार्च) रोजी दुपारी राहत्या घरी बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटनांमुळे शिवनाई व परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केले आहे. रुखमाई काळे यांच्या पश्चात पती, एक मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, सतीश बोडले, राहुल बल्लाळ, संजय चव्हाण, घटनास्थळी दाखल झाले. तसेच रुखमनबाई काळे यांना बिडकीन ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गोरे यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला.
शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या...
दुसऱ्या एका घटनेत शेतकरी दाम्पत्याने शेतात जाऊन आत्महत्या केल्याची घटना सोयगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. सोयगाव तालुक्यातील महालब्दा गावातील ही घटना आहे. संदीप आळेकर आणि लताबाई आळेकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याचे नाव आहे. आपल्या मुलाला भावाकडून सोडून महिला आणि पती शेतात गेले. त्यानंतर पतीने गळफास तर पत्नीने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अजून स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :