Raosaheb Danve On Vidhan Parishad Election: महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचे घमासान पाहायला मिळत आहे. विधानपरिषदेसाठी 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली असून भापजचे पाच तर महाविकास आघाडीचे सहा उमेदवार एकमेकांशी भिडणार आहेत. तर यावेळी आम्ही वेगळा डाव टाकणार असून, भाजपचे सर्वच उमेदवार विजयी होणार असल्याचं भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने विचारपूर्वक विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाच उमेदवार दिले आहेत. यापूर्वी शतरंज के बादशहा देवेंद्र फडणवीस यांनी शतरंजी खेळ खेळून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हरवले. आता तोच खेळ आम्ही खेळणार नाही. यावेळी आम्ही वेगळा डाव टाकणार आहे. कारण या तिन्ही पक्षांना आमचा डाव माहित झाला असून ते आता त्याच रस्त्याने जाणार आहे.
त्यामुळे यावेळी आम्ही वेगळा मार्ग काढू आणि यावेळी सुद्धा आम्ही आमचे विधानपरिषदेचे सर्व उमेदवार निवडून आणू असं दानवे म्हणाले. फक्त एकनाथ खडसे यांचाच नाही तर तिन्ही पक्षांचा पराभव करण्याचा आमचा डाव आहे. आम्ही केवळ कुणा नावाच्या वक्तीला नाही तर पक्षाला हरवणार आहोत. खडसे यांना उमेदवारी देऊ नयेत असा कोणताही प्रस्ताव आम्ही दिला नव्हता, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न असल्याच सुद्धा दानवे म्हणाले.
जलील यांना उत्तर...
पंकजा मुंडे यांनी नवीन पक्ष काढावा असे जलील म्हणाले असल्याचा प्रश्नाला उत्तर देताना दानवे म्हणाले की, राजकारणात दुसऱ्यामध्ये कसा खोडा घालता येईल असा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. जलील म्हणाले म्हणून पंकजा मुंडे त्यांना प्रतिसाद देतील असं काही नाहीत. पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्या आहेत. त्यामुळे अशा कुणाच्या बोलण्यावरून त्या निर्णय घेतील असे काही नाही. पंकजा मुंडे यांच्याबद्दल पक्ष योग्य त्या ठिकाणी नक्कीच विचार करेल याची मला खात्री आहे.