Maharashtra Political Crisis: राज्यातील राजकीय परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत आहे. अशात ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र आम्ही सरकार पाडणार नसल्याची स्पष्ट भूमिका भाजप नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. तसेच ठाकरे सरकार त्यांच्यामधील बंडाळीमुळे पडेल असेही दानवे म्हणाले. तर सद्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याच दानवे यांनी स्पष्ट केले. 


काय म्हणाले दानवे.... 


एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दानवे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात या राज्यातील सरकारला ज्या-ज्या गोष्टीत अपयश आले, त्या सर्वांचे खापर त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर फोडले. मग अतिवृष्टी असो, शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न असो किंवा कोरोना काळातील परिस्थिती असो, प्रत्येकवेळी आम्हाला दोषी ठरवले. खरतर विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजप-शिवसेना युतीला मतदान केले. यावेळी झालेल्या सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीससच मुख्यमंत्री असणार आहे. त्यावेळ शिवसेनेने कोणताही आक्षेप घेतला नाही. मात्र जेव्हा निकाल हाती आले तेव्हा यांच्या लक्षात आले की, आमच्या शिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती केली आणि अनैसर्गिक सरकार बनवले.


बंडाचा भाजपशी संबध नाही...


मात्र हे जनतेला मान्य होतं, ना शिवसेनेला मान्य होतं. तेव्हापासून आजपर्यंत हे लोकं म्हणतात की, भाजपचा हात असून ते आमचं सरकार पाडणार आहे. मात्र आम्ही पहिल्यांदाच स्पष्ट केले आहे की, आम्ही यांचे सरकार पाडणार नाही. पण यांच्याच बंडाळीमुळे सरकार पडले तर, त्याला आम्ही जवाबदार नाही. आज तेच घडले असून, शिवसेना आमदारांना निधी मिळत नसल्याचे त्याचं म्हणणे आहे. शिवसेनेवर अन्याय होत असल्याची त्यांची भावना असल्यानी त्यांनी बंड केले. पण त्यांनी बंड केल्याने याचा भाजपशी काहीही संबध नाही. तसेच आमच्यापर्यंत अजूनही कुणाचा प्रस्ताव आलेला नाही आणि त्यांचा प्रस्ताव आला तर आमची कोअर टीम बसून त्यावर विचार करेल, असेही दानवे म्हणाले. 


आम्ही लक्ष ठेवून आहोत... 


भारतीय जनता पार्टी काही मुकदर्शी पार्टी नाही. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडीकडे आमचे पूर्णपणे बारकाईने लक्ष आहे. कोणत्या स्थितीमध्ये काय करायचे याचे निर्णय आम्हाला करावेच लागेल. आमच्या बैठका सुरूच आहे. पण या बैठका शिवसेना बंडखोरांच्या बाबतीत आहे असे होत नाही.


निर्णय जनता करेल...


आज उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सगळी जवाबदारी त्यांची असून, अशाप्रकारे तोडफोड करून राज्य चालवता येत असेल किंवा बहुमत टिकवता येत असेल तर याचा निर्णय जनता करेल. आम्ही सद्या वेट अंड वाचच्या भूमिकेत असून, आमच्याकडे अजूनही कुणाचा प्रस्ताव आला नाही. आम्ही कुणाला फूस लावली नाही, किंवा राज्यपाल यांच्याकडे सुद्धा सरकार स्थापनाबाबत मागणी केली नसल्याच दानवे म्हणाले.