Aurangabad Education News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) घेतलेल्या एम.एस्सी.च्या परीक्षेबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चक्क नापास विद्यार्थ्यांचे गुण वाढवून त्यांना पास करण्यात आले होते. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून परीक्षा विभागातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परीक्षा व मूल्यमापन संचालक गणेश मंझा यांच्या तक्रारीवरून परीक्षा विभागातील कक्ष अधिकारी दिनेश रंगनाथ पांढरे (32, रा. पडेगाव) व कोमल किसन गवळी (28, रा. सिडको महानगर) या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मार्च-एप्रिल 2019 मध्ये औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील महाविद्यालयांत एम.एस्सी. रसायनशास्त्र, डी. फॉर्मसी या विषयाची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल मे 2019 मध्ये जाहीर करण्यात आला होता. दरम्यान या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पुनर्तपासणीकरिता अर्ज दाखल केले होते.
पेपर पुनर्तपासणीकरिता आल्यावर कक्ष अधिकारी दिनेश रंगनाथ पांढरे आणि तत्कालीन कर्मचारी कोमल किसन गवळी यांनी संगनमत करून नापास झालेल्या एमएस्सी रसायनशास्त्र या विषयातील सहा विद्यार्थ्यांचे प्रत्येकी दोन सत्रांचे गुणपत्रिकेतील गुणवाढ मिळून एकूण 12 विद्यार्थ्यांच्या गुणात बदल केला. विशेष म्हणजे यासाठी कोमल गवळी हिने कोड वापरून यूजर आयडी वापर करून गुण वाढ केली. ज्यात 8 नोव्हेंबर 2019 ते 29 नोव्हेंबर 20019 दरम्यान गुणात वाढ केल्याची माहिती समोर आली आहे.
डीफॉर्मसी विद्यार्थ्यांच्या गुणात देखील वाढ
एमएस्सी रसायनशास्त्र प्रमाणेच डीफॉर्मसी विद्यार्थ्यांच्या गुणात देखील वाढ करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. डीफॉर्मसी या विषयातील विद्यार्थी असे एक-एक विद्यार्थी, दोन्ही अभ्यासक्रम मिळून एकूण 23 विद्यार्थ्याचे परस्पर गुण वाढवून गुणपत्रिका वितरीत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणी दिपक पांढरे आणि कोमल गवळी या दोघांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीच निलंबित केले...
विशेष म्हणजे या प्रकरणी विद्यापीठ स्तरावर याची चौकशी करून या प्रकरणी दोषी आढळल्याने वरील दोघांना 2019 मध्येच निलंबित करण्यात आले होते. मात्र या प्रकरणी शनिवारी परीक्षा विभागाच्यावतीने वरील दोघांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून वरील दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI