Aurangabad News: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा राज्यभरातील शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात पोहचत आहे. या महाप्रबोधन यात्रेला मोठा प्रतिसाद देखील मिळताना पाहायला मिळत आहे. दरम्यान सुषमा अंधारे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून, शुक्रवारी त्यांनी शिंदे गटाचे मंत्री तथा आमदार संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात सभा घेतली. मात्र यावेळी सुषमा अंधारे यांचे भाषण एवढे लांबले की, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या भाषणाला वेळच मिळाला नाही. मात्र वेळेअभावी नव्हे तर आपण नेहमीच पैठणला भाषण करतो, त्यामुळे भाषण झालं नसल्याचं म्हणत खैरेंनी वेळ मारून नेली. 


त्याचं झालं असे की, पैठणच्या शिवाजी चौकात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रानिमित्ताने शुक्रवारी सभा झाली. सुरवातीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे भाषण झाले. दरम्यान 8 वाजून 41 मिनटाला सुषमा अंधारे यांचे भाषण सुरु झाले. मात्र अंधारे यांचे भाषण एवढे लांबले की, त्यांचे भाषण संपेपर्यंत 9 वाजून 48 मिनिटे झाली. त्यामुळे खैरे यांच्या भाषणाला अवघ्या 15 मिनिटांचा वेळ उरला होता. त्यात लोकं उठून चालेले असल्याने खैरेंनी भाषण केलेच नाही. त्यामुळे खैरे यांनी व्यासपीठावरून नतमस्तक होत, सभेला आलेल्या लोकांचे आभार मानले. 


खैरेंच्या भाषणापूर्वी लोकांनी खुर्च्या सोडल्या...


सुषमा अंधारे यांचे भाषण 9 वाजून 48 मिनिटाला संपले. त्यामुळे उरलेल्या 12 मिनटात खैरे यांचे भाषण होईल असे सर्वांनाच वाटले होते. मात्र अंधारे यांचे भाषण संपताच सभेसाठी आलेल्या लोकांनी खुर्च्या सोडायला सुरवात केली. तर  काही मिनटात मैदान खाली झाले. त्यामुळेच खैरे यांनी भाषण करण्याचे टाळले असल्याची चर्चा दबक्या आवाजात ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांच्यातचं पाहायला मिळाली. 


खैरे म्हणतात... 


वेळेअभावी भाषण केले नाही का? या प्रश्नाला उत्तर देतांना खैरे म्हणाले की, वेळेअभावी मी भाषण केले नाही असे नाही. कारण मी पैठणमध्ये नेहमीच भाषण करत असतो. तसेच पैठणमध्ये खूप दबाव आणला जातोय, तेच दबाव पाहण्यासाठी मी इथे आलो होतो, असे म्हणत खैरे यांनी वेळ मारून नेली. तर याचवेळी भुमरे यांच्याकडून महाविकास आघाडीच्या लोकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप देखील खैरे यांनी यावेळी केला आहे. 


Aurangabad: 'विकासकामे करण्यापेक्षा दारूची दुकाने थाटली'; सुषमा अंधारेंच्या टीकेला भुमरेंचं उत्तर