Maharashtra Politics: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टात गेलं आहे. शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. एकीकडे सुनावणी सुरू असताना आता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हे सरकार पडणार म्हणून भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत, असा दावा खैरे यांनी केला आहे. खैरे यांच्या विधानामुळे आता राजकीय वातावरण आणखीनचं तापण्याची शक्यता आहे. 


काय म्हणाले खैरे...


औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या बैठकीत बोलतांना खैरे म्हणाले की, निवडणुकीत मुस्लिम समाजाचे बोनस मते शिवसेनेला मिळतात. मुस्लिमांचे 20 टक्के मते शिवसेनेला मिळणार असून, ते आपले बोनस मत आहे. तर लवकरच शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होतील आणि हे सरकार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले असल्याचे विधान खैरे यांनी केले आहे. त्यामुळे यापूर्वी शिवसेनेत झालेली बंडखोरी आता काँग्रेसमध्ये पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.  


खैरेंना पटोलेंच उत्तर...


शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास काँग्रेसचे 22 आमदार फडणवीस यांच्यासोबत जातील असे विधान करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. यावर बोलतांना पटोले म्हणाले की, ज्यांना आपला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी इतरांच्या पक्षावर बोलण्याचे कोणतेही कारण नाही, असा खोचक टोला पटोले यांनी खैरे यांना लगावला आहे. तर खैरे यांच्या विधानामुळे आता काँग्रेस-शिवसेना असा वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.  


काँग्रेस आमदार फुटण्याची यापूर्वीही चर्चा...


काँग्रेसचे आमदार फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे विधान खैरे यांनी केले असले तरीही यापूर्वी देखील काँग्रेस आमदार फुटणार असल्याची अनेकदा चर्चा झाली. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर अशोक चव्हाण,असलम शेख यांच्यासह अनेक काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा झाली. त्यात आता खैरे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आमदार फडणवीसांच्या सोबत जाण्याची शक्यता वर्तवली असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.