औरंगाबाद :  एमआयएम (MIM) पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil ) यांच्यावर पुन्हा एकदा चक्क नोटांचा वर्षाव करण्यात आला आहे. औरंगाबाद आमखास मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पडत होता. तर जलील यांच्यावर पैसे उधळण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे जलील यांच्यावर नोटा उधळण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील खुलताबाद येथे एका कव्वालीच्या कार्यक्रमात आणि एका लग्नसमारंभात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनीही जलील यांच्यावर नोटा उधळल्या होत्या.


खासदार जलील यांच्याकडून आमखास मैदानावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून तर राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येक जण येऊन भेट देऊन जात आहे. दरम्यान शुक्रवारी याच आमखास मैदानावर जलील यांच्याकडून कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र कव्वाली सुरू होताच जलील यांच्या समर्थकांकडून जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पाडताना पाहायला मिळाले. दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर एकदाही शेतकऱ्यांच्या बांधावर न जाणारे जलील यांच्यावर अशा प्रकारे पैसे उधळताना बघून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


यापूर्वीही उधळले होते पैसे... 


यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये  एमआयएमचे तत्कालीन औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीचे लग्न शहरातील एका प्रसिद्ध लॉ मध्ये झालं होतं. यावेळी कव्वालीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. दरम्यान यावेळी आलेले जलील नरवदेवाला भेटण्यासाठी व्यासपीठावर जाताच त्यांच्यावर नोटांचा वर्षाव करण्यात आला होता. तर खुलताबाद येथे आयोजित एका कव्वालीच्या कार्यक्रमात देखील जलील यांच्यावर अशाच प्रकारे पैसे उधळले गेले होते.


पाहा व्हिडीओ :



शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी वेळ नाही...


गेल्या दोन आठवड्यापासून जलील यांच्याकडून शहरातील आमखास मैदानात वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जात आहे. मात्र याचवेळी औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी या काळात जलील एकदाही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच जलील यांच्यावर कव्वालीच्या कार्यक्रमात पैसे उधळल्याचा व्हिडिओ समोर आल्याने, अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर विरोधकांनी टीकाही केली आहे.