Aurangabad News: सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबवत नागरिकांना शौचालय बांधण्याचे सातत्याने आवाहन केले जाते. त्यासाठी सरकार अनुदान देखील देते. यासाठी वेगवेगळ्या उपयायोजना आणि जाहिरात्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत शौचालयाबाबत माहिती पोहचवण्यात येत असते. दरम्यान जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून शनिवारी 19  नोव्हेंबर रोजी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या  पाणी व स्वच्छता विभागाने अनोखा उपक्रम हाती घेतला असून, ज्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कारण यादिवशी चक्क 'शौचालयाचा वाढदिवस' साजरा करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.


'माझे शौचालय' ही भावना लोकांमध्ये वृद्धिंगत व्हावी, यासाठी जि.प. प्रशासनाने जागतिक शौचालय दिनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हाभरात या दिवशी प्रत्येक कुटुंबाने आपल्या शौचालयासमोर रांगोळी काढावी, शौचालयाच्या दरवाजाला तोरण बांधून त्यापुढे सेल्फी घ्यावी व ती जिल्हा कक्षाला पाठवावी, असे आवाहन सीईओ विकास मीणा, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी केले आहे. 


सेल्फी पाठवण्याचे आवाहन... 


शौचालयाच्या सोबत काढलेला सेल्फी (Selfie With Toilet) पाठविण्यासाठी जिल्हा कक्षाने एक लिंक तयार केली आहे. या लिंकवर क्लिक करून ग्रामपंचायतीचे नाव, गाव नाव, सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीचे नाव तसेच शौचालय वापरामुळे झालेला फायदा, ही माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. सोबतच ग्रा.पं. मधील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करून त्यावर विद्युत रोषणाई करावी, लिंकवर त्यासंबंधीचा फोटो अपलोड करावा. ग्रा.पं. मध्ये लोकसहभागातून सार्वजनिक ठिकाणी, शाळा, अंगणवाडीत साफसफाई, प्लास्टिक व्यवस्थापन, सिंगल यूज प्लास्टिक जमा करणे, पाणी व स्वच्छतेविषयी जनजागृती करणे, हेही या उपक्रमाचा भाग असणार आहे. 


नाशिकच्या शिक्षण विभागाकडूनही असाच आदेश... 


नशिकच्या शिक्षण विभागाने देखील असाच काही अनोखा आदेश काढला आहे. या परिपत्रकानुसार जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने संबधित विभागाने विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. ज्यात पथनाट्य,चित्रकला आणि शौचालयासोबत सेल्फी काढण्याचा स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत. मात्र या स्पर्धामुळे शिक्षकांची मोठी अडचण झाली आहे. कारण अनेक शाळेत शौचालयांची अवस्था बिकट असून, अशा शौचालयासोबत स्लेफी काढण्यासाठी स्वच्छत करणार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे अनेक शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.


Video: धक्कादायक! रिक्षा चालकाकडून अश्लील प्रश्न, घाबरलेल्या मुलीची धावत्या रिक्षातून उडी