परभणी : बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन प्रवास केल्याप्रकरणी परभणीच्या जिंतुर आगराला उपविभागीय अधिकाऱ्यांनी तब्बल एक लाखांचा दंड ठोठावला आहे. अशाप्रकारे एवढा मोठा दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


लातूर-जिंतुर ही MH 20 BL 1922 क्रमांकाची बस जिंतुरकडे येत असताना या बसची तपासणी करण्यात आली. परभणी-जालना-जिंतुर रस्त्यावरील सप्तगिरी हॉटेलसमोर बस उभी करुन जिंतुरचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सखाराम मांडवगडे आणि जिंतुर नगरपरिषदचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने तपासणी केली. 


यावेळी या बसची आसन व्यवस्था ही 44 जागांची असताना तब्बल 81 प्रवासी बसवलेले होते. महत्त्वाचे म्हणजे एक कुत्र्याचे पिल्लूही बसमध्ये प्रवास करत होते. त्यातच प्रवाशांच्या तोंडाला ना मास्क होते, ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टनसिंग. यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 20 फेब्रुवारी रोजी काढलेल्या वाहन क्षमतेपेक्षा आत प्रवासी संख्या घेऊन जाण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले. 


शिवाय कोरोना संसर्ग वाढेल असे कृत्य करुन निष्काळजीपणा केल्याने जिंतुर आगार व्यवस्थापकांना तब्बल 1 लाखांचा दंड ठोठावला आहे. महत्त्वाचे म्हणजे 22 मार्चपर्यंत हा दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी काढले आहेत.