Maharashtra NCP Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्ष झाल्यानंतर राज्यात आणखी एक बंड झाले. अजित पवार यांनी काही आमदारांना हाताशी घेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केले. अजित पवारांच्या बंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडलेय. जितेंद्र आव्हाड, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांनीही या बंडावर प्रतिक्रिया दिली. शिवसेनेचे नेते (ठाकरे) आदित्य ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत आजच्या शपथविधीवर ट्वीट केले आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं; मग आज भाजपाने काय केलं? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये चार प्रश्न उपस्थित केले आहेत.
आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेले प्रश्न कोणते ?
मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??
रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो... जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी??
एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, “१४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला??
आणि सर्वात महत्वाचं... आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं. मग आज भाजपाने काय केलं?? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना!
एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! 'स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी', अशी ही लढाई असणार आहे! असे थेट शब्दाद आदित्य ठाकरे यांनी अजित पवार यांच्या बंडावर आणि भाजपच्या रणनितीवर भाष्य केले आहे.