Sharad Pawar : महाराष्ट्राची सुटका झाली. एक चांगला निर्णय घेतला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा राजीनामा आधीच घ्यायला हवा होता. कोश्यारींनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी व्हायला हवी, असेही शरद पवार म्हणाले. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती
महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती, अशी व्यक्ती आपण पहिल्यांदाच पाहिल्याचे शरद पवार म्हणाले. आता केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी त्यामध्ये बदल केला ही समाधानाची बाब असल्याचे पवार म्हणाले. जे जे संविधानाच्या विरोधात झाले त्याची चौकशी होणं गरजेच असल्याचे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वादग्रस्त वक्तव्यानंतर कोश्यारींना झाला होता मोठा विरोध
भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र लिहिले होते. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता. आज अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात चर्चित ठरलेले राज्यपाल ठरले आहेत. त्यांनी सर्वात आधी मुंबईत बोलताना मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढले होते. मुंबई आणि ठाण्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही, असं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यानंतर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर समर्थ रामदास यांच्याविना छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुन्हा ते अडचणीत आले होते. “चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं, तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे, असं समर्थांना म्हटलं,” अशा आशयाचं वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं. तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत देखील कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या: