Nashik News : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास -प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती (Police Bharati) पूर्व प्रशिक्षण, स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत टॅबचे वितरण करण्यात आले. यात दररोज सहा जीबी डेटा वर्षभर फ्री मिळणार आहे. 


महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jotiba Fule) संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (Mahajyoti), नागपूर (Nagpur) यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना टॅब वाटप कार्यक्रमात पालकमंत्री भुसे बोलत होते. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले, ग्रामीण आणि शहरी भागातील ज्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचा मोबाईल, इंटरनेट डाटा (Internet Deta) उपलब्ध होऊ शकत नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत टॅबचे वितरण करण्यात येत आहे. या टॅब सोबत दररोज 6 जीबी इंटरनेटचा डाटा एक वर्षासाठी मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील ज्या विद्यार्थ्यांना 60 आणि 70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, त्या विद्यार्थ्यांना  जेईई, नीट सीईटी परीक्षांच्या अभ्यासाकरीता 593 विद्यार्थ्यांना या टॅबचे वाटप करण्यात आले. या टॅबचा वापर विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठीच करून आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे ही पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.


राज्यशासन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना आवश्यक सुविधा पुरविणाऱ्यावर भर देत आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन त्या शाळांचा स्तर उंचावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने अंगणवाडी आणि बालवाडी मधील विद्यार्थ्याची दर तीन महिन्यांनी नियमित आरोग्याची तपासणी करण्यात येणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना हेल्थ कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यावर्षापासून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत मुलींनाही प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी राज्यातील मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून भविष्यात आपल्या जिल्हा आणि राज्यातील अनेक मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत राज्यातील मुलींची संख्या वाढणार असून त्या आपल्या जिल्ह्यासह राज्याचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वासही पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.


पालकमंत्री दादा भुसे पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध होण्याकरिता सुपर 50 हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या उपक्रामातून ग्रामीण भागातील 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना पुढील शिक्षणासाठी निवास आणि भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. शासन आणि प्रशासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. तसेच विद्यार्थी जीवनात घेतलेले निर्णय हे आयुष्याला दिशा देणारे असतात, त्यामुळे विद्यार्थी दशेत घेतलेला प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेण्यात यावा. त्याचप्रमाणे जीवनात आई-वडील, गुरुजनांचा सन्मान करून व्यसनापासून स्वतःला दूर ठेवावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.