Nanded Deglur Biloli By Election Results : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी 64 टक्के मतदान झाले होते. देगलूर येथे आज, मंगळवारी (2 नोव्हेंबर) या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. तत्कालीन आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक घोषित करण्यात आली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीनं देखील जोमानं प्रचार करुन निवडणुकीत रंगत आणल. आज पार पडणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनानं देखील जय्यत तयारी केली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शनिवारी या पोटनिवडणुकीत एकूण 12 उमेदवाराचं भवितव्य मतपेटीत कैद झालं आहे. आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात महाविकास आघाडी, भाजपा, वंचित आघाडी अशी प्रमुख लढत झाली आहे. मतदार राजाने कुणाला पंसती दिली, हे आज जाहीर होणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस तथा महाविकास आघाडीकडून जितेश अंतापूरकर (jitesh antapurkar), भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष साबणे (Subhash Sabane) तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात आहेत.
2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर 89 हजार 400 मताधिक्य मिळून विजयी झाले होते. त्याचप्रमाणे त्यावेळचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 560 तर वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन उमेदवार रामचंद्र भरांडे यांना 13 हजार 300 मतदान पारड्यात पडली होती.
दिग्गजांच्या प्रचारसभा
ही पोटनिवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची ठरत आहे. निवडणुकीच्या आधी शिवसेनेत असलेले सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना प्रवेश केल्यानंतर उमेदवारीही मिळाली तर दुसरीकडे काँग्रेसनं दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना संधी दिली. या निवडणुकीत प्रचारासाठी दिग्गजांनी हजेरी लावली आणि विजयाचा दावा केला आहे. भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्या अनेक दिग्गजांच्या सभा पार पडल्यात तर महाविकास आघाडीकडून मंत्री अशोक चव्हाण, छगन भुजबळ, नाना पटोले यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. वंचितकडून प्रकाश आंबेडकरांनी देखील सभा घेतल्या आहेत.