Waman Meshram : 2024 च्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम (EVM) मशीन फोडा. त्यासाठी प्रत्येक समाज घटकातील पंधरा-पंधरा लाख कार्यकर्ते आतापासूनच तयार करा असं खळबळजनक वक्तव्य भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम (Waman Meshram) यांनी केलं आहे. ईव्हीएम फोडणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा होईल. मात्र, पुढे त्यांना आपण स्वातंत्र्य सेनानीचा दर्जा देऊन नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देऊ असेही मेश्राम म्हणाले. निवडणूक प्रक्रिये विरोधात मेश्राम यांनी केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
ईव्हीएम मशीन विरोधात वातावरण निर्मिती करणार
येणाऱ्या 2024 लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन फोडा. त्यासाठी भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश देत आहे की उद्यापासूनच तयारीला लागा, बैठका घ्या, लाखो कार्यकर्ते तयार करा असे वामन मेश्राम म्हणाले. ते नागपूरमध्ये 'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा भांडाफोड' सभेत बोलत होते. 2024 पूर्वी देशभरात ईव्हीएम मशीन विरोधात वातावरण निर्मितीसाठी वामन मेश्राम यांनी राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा काढली आहे. त्या निमित्ताने नागपूरच्या इंदोरा मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेत वामन मेश्राम यांनी हे वक्तव्य केलं.
लोकसभा निवडणुकीपूर्वी EVM मशीनच्या विरोधात भारत बंद आंदोलन करणार
ईव्हीएम मशीनच्या (EVM) माध्यमातून होणाऱ्या निवडणुकांमध्ये घोटाळे होतात. त्यामुळं आम्ही निवडणूक आयोगाला त्यात सुधारणा करण्यासाठी अनेक वेळेला मागणी केली आहे. मात्र, निवडणूक आयोग आमचं ऐकत नाही. त्यामुळं 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशीनच्या विरोधात मोठा भारत बंद आंदोलन करणार असल्याचेही वामन मेश्राम म्हणाले. मात्र, जर ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सुधारणेबद्दल निवडणूक आयोगाने ऐकले नाही तर 2024 च्या निवडणुकांमध्ये सर्रास ईव्हीएम मशीन फोडा असे निर्देश वामन मेश्राम यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यासाठी उद्यापासूनच तयारीला लागा, बैठका घ्या, नियोजन करा आणि त्याचे व्हिडिओ बनवा असे निर्देशही वामन मेश्राम यांनी दिले आहेत.
EVM मशीन फोडण्यासाठी लाखो कार्यकर्ते तयार राहा
EVM मशीन फोडण्यासाठी देशभरात लाखो कार्यकर्ते तयार करण्याचे निर्देशही मेश्राम यांनी दिले आहेत. 2024 च्या निवडणुकीत देशभरात 15 लाख मतदान केंद्र असणार आहेत. त्यामुळं ईव्हीएम मशीन फोडण्यासाठी 15 लाख अनुसूचित जातीचे, पंधरा लाख अनुसूचित जमातीचे, पंधरा लाख भटक्या जमातीचे, पंधरा लाख अल्पसंख्याक समाजाचे तर पंधरा लाख महिला एवढे कार्यकर्ते तयार करण्याचे निर्देश मेश्राम यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या: