मुंबई : राज्यभर अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून मुंबई आणि पुण्याला चांगलेच झोडले आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. तर पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरुप आल्याचं दिसून आलं. मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे पुण्यातील स्वारगेटमध्ये पाणीच पाणी झाले. त्यातच लाईट गेल्यामुळे प्रवाशांना वाट काढून बसच्या दिशेने जावे लागले. 

Mumbai Rain Update : मुंबईत विजांच्या गडगडाटासह पाऊस

मुंबई आणि मुंबई उपनगरासह आसपासच्या महानगरांना मंगळवारी संध्याकाळपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलं. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह पडलेला हा पाऊस धडकी भरवणारा होता. त्यात संध्याकाळच्या सुमारास सारा नोकरदार वर्ग आपापल्या कार्यालयांमधून घराच्या दिशेनं निघाला होता. अचानक आलेल्या पावसानं त्या साऱ्यांची मोठी तारांबळ उडवली. अचानक आलेल्या तुफान पावसामुळे अंधेरी सब वे पाण्याखाली गेला होता. काही तासाच्या विश्रांतीनंतर पश्चिम उपनगरात रात्री पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. 

Pune Rain Update : पुण्यात गाड्या वाहून गेल्या

पुणे शहर आणि उपनगरामध्ये मंगळवारी संध्याकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. शिवाजीनगर, सदाशिव पेठ, सहकार नगर, धनकवडी, कात्रज, कोंढवा, खडकवासलासह अनेक भागात अधिक पावसाची नोंद झाली. पावसामुळे सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे काहीवेळ वाहतूक कोंडीही झाल्याचं दिसून आलं. 

अचानक आलेल्या या मुसळधार पावसाचा नागरिकांनाही फटका बसला. या पावसाचं पाणी काही घरांमध्येदेखील शिरल्याचं दिसून आलं. मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. जोरदार पावसामुळे आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात, अनेक गाड्या वाहून गेल्या.

Maharashtra Weather Today : राज्यभर पावसाची हजेरी

राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसानं हजेरी लावली. मे महिन्याच झालेल्या दमदार पावसाच्या एण्ट्रीमुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं चित्र आहे. रत्नागिरी, सातारा, सोलापूरसह वर्ध्यातही मान्सूनपूर्व पाऊस झाला. दरम्यान पुढचे चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

IMD Warning Rain Update : येत्या चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यानं त्याचा प्रभाव मुंबईसह महाराष्ट्रात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रावर दिसणार आहे. त्यामुळं येत्या 22 मे ते 24 मे या कालावधीत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ही बातमी वाचा :