Mahim Majar :  माहिममधील मजारीचा (Mahim Majar) मुद्दा दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 2007 मध्येच मांडल्याचे समोर आले आहे. सामना या वृत्तपत्रात याबाबतची बातमी आली होती. माहिममधील किनाऱ्यावर हिरवा झेंडा कसा? असा सवाल सामनातून बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित केला होता. माहिमच्या समुद्रावर हिरवा झेंडा या मथळ्यानं ही बातमी 2007 साली सामनात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, हाच मुद्दा काल गुढीपाडव्याच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मांडला होता. त्यानंतर माहीम समुद्रातील वादग्रस्त मजारीभोवतीचं अनधिकृत बांधकाम (Unauthorized construction) हटवण्यात आलं आहे.


2007 पासून हा मुद्दा चर्चेत 


मुंबईतील माहीम दर्ग्यामागे  अरबी समुद्रात बनलेल्या मजारीवरून वाद  पेटला आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामावर प्रशासनाची कारवाई सुरु आहे. तर दुसरीकडं असा प्रश्न उपस्थित होतोय की ही जागा राज्य सरकार आणि राज ठाकरेंच्या आताच निदर्शनास आली का? तर नाही. ही जागा  2007 पासून चर्चेत आहेत. हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी 2007 मध्ये तत्कालीन सरकारला विचारला होता.


समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम कोणी करु नये


दरम्यान, याबाबत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय यापूर्वीचं सामना या वृत्तपत्रानं काही वर्षापूर्वी समोर आणला होता. मध्यंतरी सेना-भाजपचे सरकार होते. आता पुन्हा सेना भाजपचे सरकार आहे. अशा वेळी योग्य दखल घेणं सरकारचं काम असल्याचे वळसे पाटील म्हणाले. या माध्यमातून कोणीही समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम करु नये असेही वळसे पाटील म्हणाले. 


मजारीभोवतीचं अनधिकृत बांधकाम हटवलं


माहीम समुद्रातील वादग्रस्त मजारीभोवतीचं अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई महापालिकेचं (Mumbai Palika) अतिक्रम विरोधी पथक माहिमच्या समुद्रात दाखल झालं होतं. त्यानंतर कारवाई सुरु करण्यात आली होती. अखेर माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण झाली आहे. दरम्यान, माहिम किनारा परिसर आणि दर्ग्याभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


माहीम किनारा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात 


मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी या मजारीचा उल्लेख केला होता. हे अनधिकृत बांधकाम जर एक महिन्यात पाडलं नाही तर आम्ही तिथं गणपतीचं मंदिर बांधू असा इशारा राज यांनी दिला होता. त्यानंतर अवघ्या 12 तासांच्या आत कारवाईला सुरुवात झाली होती. दरम्यान, माहीम किनारा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशसानं योग्य ती दक्षता घेतली आहे. कारवाईत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला.


महत्त्वाच्या बातम्या:


Mahim Majar : राज ठाकरेंचं अल्टिमेटम, मजारीभोवतीचं बांधकाम हटवलं; माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण