Corona Virus Update : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होतेय. आज राज्यात 37 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यानंतर ठाणे आणि पुण्यातही दररोज रुग्ण वाढत आहेत. नाताळ आणि नववर्षामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आरोग्य विभागाने घाबरु नका... खबरदारी घ्या... असे आवाहन केले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात आज एकही जेएन.1 या सबव्हेरियंटचा रुग्ण आढळला नाही. राज्यात सध्या जेएन 1 व्हेरियंटचे 10 रुग्ण आहेत. 


राज्यात आज 11 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. राज्यात आजपर्यंत एकूण 80,23,442 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.18 % एवढे झाले आहे. आज राज्यात 37 नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१% एवढा आहे. राज्यात एकूण ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १९४ वर पोहचली आहे. मुंबईत सर्वाधिक सक्रीय रुग्ण आहेत. 


मुंबईत सर्वाधिक रुग्ण - 


मुंबईतील कोरोना रुग्णांची संध्या वाढली आहे. आज मुंबईत नव्याने 19 कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आजच्या घडीला 88 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, JN -1 या नव्या सबव्हेरियंटचा एकही रुग्ण मुंबईत नाही. मुंबईत आज  2 रुग्ण रुग्णालयात दाखल झालेत. महानगरपालिकेकडे असलेल्या 4,215 बेड्सपैकी 9 बेडवर सध्या कोरोना रुग्ण आहेत.  


लसीची गरज नाही - 


2022 जानेवारीमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेयरियंटने धुमाकूळ घातला होता. जगभरात कोरोनाची तिसरी लाट आली होती. कोरोना विषाणू म्यूटेशनमुळे नवे व्हेरियंट येत आहे. सध्या आलेल्या जेएन1 या कोरोना सब व्हेरियंटसाठी लसीकरणाची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलेय.  


जागतिक आरोग्य संघटनेचाही इशारा
गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 52 टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी ही माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या अहवालात म्हटलं आहे की, 20 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान कोरोनाच्या एकूण 8,50,000 हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. दरम्यान, जगभरात गेल्या 28 दिवसांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये 8 टक्क्यांची घट झाली आहे, यामध्ये 3,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


देशात कोरोना रुग्णांची संख्या किती ?


आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात आज 116 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यू झालाय. तिन्ही रुग्ण कर्नाटकमधील आहेत. मागील 24 तासांत 293 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 4170 इतकी झाली आहे.