Monsoon : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. अशातच काल केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आज लगेच राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन झालं आहे. या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु आहे. मात्र, मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळं राज्यात पावसात घट होणार असून, शेतकऱ्यांनी (Farmers) पेरणीची घाई करु नये असे आवाहन कृषी विभागानं केलं आहे.  

या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु आहे. त्यामुळं तो 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे. जो सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच दाखल झाला आहे. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे. सध्याच्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. किमान 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळं किमान 5 जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो.

पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता 

या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस

दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे. येत्या 36 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागात पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. दरम्यान, एका बाजूला पाऊस पडत असताना दुसऱ्या बाजूला काही भागात शेती पिकांना देखील फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Mahabeej : मान्सूनचं मे महिन्यातच आगमन, महाबीज देखील सज्ज, खरिपासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणं पुरवणार, साथी पोर्टलवर नोंदणीचं आवाहन