Maharashtra Rain : राज्याच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. आज विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. अशातच एक दिलासादायक बातमी आली आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं (Monsoon) आगमन झालं आहे. हवामान विभागानं अधिकृतरित्य याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या पावसामुळं काही भागात शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र देखील दिसत आहे. दरम्यान, आजही राज्यात जोरदार पावसाचा इशरा हवामान विभागानं दिला आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात राज्याच्या कोण कोणत्या भागात पाऊस सुरु आहे. 

पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस

पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. शहरासह दौंड तालुक्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने तालुक्यामधील छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. मसनरवाडीमधील असलेल्या मेरगळमळ्यातील ओढ्यावरील पुलावरुन पाणी जात असल्याने गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच रस्ते देखील पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी गावकऱ्यांनी वड्याच्या आजूबाजूला असलेले झाडे झुडपे देखील काढली आहेत. 

पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोवा गेली वाहून 

गेल्या चार दिवसांपासून दौंड तालुक्यात पावसाचा जोर सुरू असल्याने पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. दरम्यान पावसाच्या हाहाकाराने पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोवा वाहून गेली आहे. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र पुणे सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. 

पालघरमध्ये जोरदार पाऊस, भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने पाऊस आहे तो सुरु आहे. आजही मान्सूनपूर्व पावसाने पहाटेपासून हजेरी लावली असून पावसाचे रिपरिप कायम असून या पावसामुळे उन्हाळी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला सुरुवात झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 55 ते 60 कोटीच्या आसपास वीट भट्टी भात शेती त्याचबरोबर इतर नुकसान आहे ते झालेला आहे. आताही हा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला भात पिकाचा घास हा पाऊस हिरावून घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात असल्याचे चिन्ह आहे.

बुलढाणा जिल्ह्यात सर्वच तालुक्यात सकाळपासून पाऊस सुरु

बुलढाणा जिल्ह्यात सर्वच तालुक्यात सकाळपासून सुरु आहे. रिमझिम पावसानंतर आता पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. जिल्ह्यातील बुलढाणा, खामगाव, नांदुरा व चिखली तालुक्यात दुपारपासून पावसाने धुवाधार बॅटिंग सुरु केली आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

वाशिम जिल्ह्यात पावसामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान

वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रात्री उशिरा झालेल्या वादळी पावसाने पिंपळगाव येतील शेतकरी राहुल दंडे यांच्या जनावरांचा गोठा पूर्णतः उडून गेल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. जनावरांसाठी साठवलेला चारा आणि खाद्य भिजून खराब झालं आहे. तर गोठा कोसळल्याने काही जनावरे देखील जखमी झाली आहेत.

सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरणाची पाणीपातळी 4 टीएमसीने वाढली  

गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने चंद्रभागेची पाणी पातळी तब्बल एक मीटरने वाढली आहे. यामुळं पंढरपूरला 25 जून पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा बंधाऱ्यात जमा झाला आहे. गेल्या दहा दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरात बॅटिंग सुरू असून उजनी धरणात तर चार टीएमसी एवढे पाणी जमा झाले आहे. या जोरदार पावसामुळे आज उजनी धरणात तब्बल दहा हजार क्युसेक वीसर्गाने पाणी येत आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास 171 मिलिमीटर एवढा पाऊस या दहा दिवसात कोसळल्याने उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे.  

सातारा जिल्ह्यात तुफान पाऊस, कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो

सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने पुढील चार दिवस ऑरेंज दिला असून कोयना धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. कोयना नदीवरील निसरे, तांबवे बंधाऱ्यावरून पाणी ओसडून वाहू लागले आहे. तर कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेने भरल्याने तो ओव्हरफ्लो वाहू लागला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना कृष्णा नदीसह सर्व नद्यांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळत आहे. 

तीन राज्यांच्या सीमेवर असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मांगेलीचा धबधबा प्रवाहीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली येथील धबधबा प्रवाहित झाला आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या मागेलीतील प्रवाहित झालेल्या धबधब्यामुळे पर्यटक वर्गात आल्हाददायक वातावरण पसरले आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे वर्ष पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली धबधबा प्रवाहित झाला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, बेळगांव, येथून वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक येतात. या परिसरात रिमझिम बरसणारा थंडगार पाऊस, दाट धुके, मनमोहक निसर्ग सौंदर्य, दूरवर दिसणारा तिलारी धरणाचा विस्तीर्ण जलाशय अशा अनेक गोष्टींमुळे पर्यटकांची पाऊले येथे वळतात. त्यामुळे हा परिसर नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो. प्रथमच मे महिन्यात हा धबधबा प्रवाहित झाला आहे. 

बीड जिल्ह्यात आठ दिवसापासून मुसळधार पाऊस

गेल्या आठ दिवसात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे बीड जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या कपिलधारचा धबधबा प्रवाहित झाला आहे. विशेष म्हणजे प्रथमच मे महिन्यातच हा धबधबा प्रवाहित झाल्याचे दिसून आले. यंदा मे महिन्यात जिल्ह्यात 119 मिलिमीटर पावसाची उच्चांकी नोंद झाली. शुक्रवारी रात्री 20 मिमी पाऊस नोंदवला गेला आणि यामुळेच कपिलधार येतील दोन्ही धबधबे हे प्रवाहित झाले आहेत. शंभर फुटाहून धबधब्याचे पाणी पडत असून आता या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे.

मान्सूनपूर्व पावसामुळे काढणीला आलेला कांदा शेतातच सडला

गेल्या काही दिवसात बीडमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र आता याच पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. बीड तालुक्यातील वडगाव कळसंबर येथे मान्सूनपूर्व पावसाने काढणीसाठी आलेला कांदा पाण्याखाली गेल्याने सडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ मदत देण्याची मागणी युवराज खामकर या शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात 132 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

बीड जिल्ह्यात अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने 132 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.आष्टी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून 98 शेतकऱ्यांची 38 हेक्टर शेत जमीन खरडून गेलीय. दरम्यान या पावसाने शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. कोणत्याही आदेशाची वाट न पाहता अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.