Maharashtra Monsoon Rain LIVE : रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा...
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच बीड, मुंबईसह परिसरात चांगलाच पाऊस झाला.
Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. दुपारनंतर जिल्ह्यातील वाळूज,बिडकीन,चितेगाव,करमाड,बाजारसावंगी,सिल्लोड,अजिंठा यासह अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात अजूनही पाऊस सुरूच आहे. तर सिल्लोड येथील बनकिन्होळा गावाची नदी भरून वाहत आहे.
पुढील 3 ते 4 तास रत्नागिरीसह सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. रायगड जिल्ह्याला देखील या पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह ठाण्यात अंशतः ढगाळ आकाश आहे. घाट भागातही पावसाच्या काही तीव्र सरींसाठी अनुकूल वातावरण दिसत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
महाबळेश्वरमध्ये मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासूनच पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढल्यानं वातावरणात चांगलाच बदल झाला आहे.
Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाची रिपरिप सुरु आहे. अशा पावसात मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून जीवघेणा प्रवास सुरु आहे. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळं या घाटाचा काही भाग खचला होता. वर्ष झालं तरी हा खचलेला भाग तसाच आहे. सध्या पावसाची रिमझिम सुरु आहे. या पावसात खचलेल्या भागातील माती हळूहळू खाली सरकू लागली आहे. अशा परिस्थितीतही घाटातून जीवघेणा प्रवास सुरु आहे.
गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात भात खाचरांमध्ये लगबग दिसू लागली आहे. भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईसह उपनगरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडं लातूर जिल्ह्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. लातूर जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही भागातही पावसानं चांगली हजेरी लावली. तसेच बीड जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला.
राज्यातील काही भागात जरी पाऊस पडत असला तरी अनेक ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. अद्यापही काही ठिकाणी चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला, त्या ठिकाणचे शेतकरी पेरणी करत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, रात्री मुंबई शहरासह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच लातूर, बीड, मुंबई, सोलापूरच्या काही भागात पावसानं चांगली हजेरी लावली.
लातूर जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस
लातूर जिल्ह्यात सर्वत्र पावसानं चांगली हजेरी लावली आहे. पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. त्यामुळं बळीराजा सुखावला आहे. आज सकाळपासूनच लातूर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. दुपारपर्यंत ऊन-पावसाचा खेळ सुरु होता. मात्र, दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. लातूर शहर लातूर ग्रामीण औसा किल्लारी चा काही भाग रेनापुर अहमदपूर जळकोट आणि उदगीर मधील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. सर्वत्र पावसाने हजेरी लावल्या कारणामुळं वातावरणात प्रचंड गारवा वाढला आहे. बऱ्याच भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेत तयार करुन ठेवलं आहे. पेरणीयोग्य पाऊस नसल्यामुळं पेरणी करण्यात आली नव्हती. आजच्या पावसानंतर पेरणीला चांगलाच वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील एका तासापेक्षा जास्त कालावधीपासून पावसाची संततधार सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -