Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande Attack) यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या भांडूप भागातून या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज (4 मार्च) दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 


संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन जणांपैकी अशोक खरात हे शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचे उपाध्यक्ष आहेत. ते भांडुपच्या कोकण नगर विभागाचे रहिवासी आहेत.  आज सकाळी साडेसहा वाजता गुन्हे शाखेने खरात यांना ताब्यात घेतले आहे. 



शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करताना झाला होता हल्ला


मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करत असताना काल (3 मार्च) चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना थोडा मार लागला आहे. या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त केला. तर, याची माहिती समजताच शिवाजी पार्क पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला होता.


हल्ल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप


संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना चार जणांकडून मारहाण झाली होती. ते चौघे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. हल्ल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. मनसे नेत्यांनी हल्ल्याप्रकरणी थेट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊतांच्या चौकशीची मागणी केली आहे. तर नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्याकडे बोट दाखवलं होतं.


मुख्यमंत्र्यांनीही केली होती संदीप देशपांडेंची चौकशी


संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची गांभीर्याने दखल घेत, स्वतः मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंची चौकशी केली होती. तसेच, हल्ल्यामागे जे कोणी आहे, त्याची चौकशी करुन आरोपींना कठोरातील कठोर शासन होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंना आश्वासन दिलं आहे. मुंबई पोलिसांकडूनही संदीप देशपांडेंवरील हल्ल्याची कसून चौकशी केली जात आहे. दादर पोलीस स्थानक, शिवाजी पार्क पोलीस स्थानक अशा सर्व जवळच्या पोलीस स्थानकांच्या टीम काल सकाळपासूनच याप्रकरणी तपास करत होत्या. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर नेमके कोण? हल्ल्यामागील त्यांचा नेमका हेतू काय? यांसारख्या अनेक गोष्टींचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तसेच, या घटनेतील संशयित आरोपी आणि संदीप देशपांडेंनी आरोपींचं जे वर्णन केलंय, त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी तपासाला वेग, CCTV फूटेज समोर; आज देशपांडेंची पत्रकार परिषद