Devendra Fadnavis :  राज्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत (Maharashtra MLC Election) अपेक्षित यश मिळाले नसल्याचे स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे काम झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांचे अभिनंदन केले. अपक्ष म्हणून निवडणूक लढताना एवढा मोठा विजय मिळवणे सोपं नसल्याचेही सांगत फडणवीस यांनी तांबे यांचे कौतुक केले. 


आज मुंबईत भाजपची कोअर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणुकीवर भाष्य केले. फडणवीस यांनी म्हटले की, आज झालेल्या मतमोजणीत आम्ही कोकणमधील जागा बऱ्याच कालावधी नंतर जिंकलो आहोत. नागपूरमध्ये शिक्षक परिषदेने आग्रह केला आणि निवडणूक लढवली. आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. नागपूरची जागा शिक्षक परिषदेला हवी असल्यानं ती आम्हाला लढवता आली नाही, ती जागा जिंकलो नाही याचं दुःख आहे, असेही त्यांनी सांगितले. अमरावतीमध्ये मात्र, अपेक्षित मते मिळाली नसल्याची कबुली त्यांनी दिली. अमरावतीमध्ये मतांचा कोटा कोणत्याच उमेदवाराने पूर्ण केला नाही. मात्र, आम्हाला अपेक्षे  इतकी मते मिळाली नसल्याची कबुली त्यांनी दिली.


तांबे यांचे अभिनंदन


देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबे यांचे अभिनंदन करताना कौतुक केले. महाविकास आघाडीने सत्यजीत तांबे यांना लक्ष्य करत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, सत्यजीत तांबे यांनी , तीन पक्ष एकत्र येऊनही त्यांच्याविरोधात विजय मिळवला.  निवडणूक अपक्ष लढवून जिंकल्याबद्दल सत्यजित तांबेंचं मनापासून अभिनंदन करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मते मिळाली. तर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली. अपक्ष उमेदवार असलेले सत्यजित तांबे तब्बल 29  हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी झाले.


पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरू 


आजच्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणुकांवर चर्चा झाली. यामध्ये ॲक्शन प्लॅनचा रिव्ह्यू घेण्यात आला. त्याशिवाय, लोकसभा, विधानसभा यांसदर्भात विषयावर चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: