मुंबई : केंद्र सरकारनं व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी लाल दिव्याला हद्दपार केलं आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांनीही तातडीनं लाल दिवे हटवले आहेत. अंमलबजावणीसाठी एक मे ची वाट न पाहता, लाल दिवे लगेचच हटवण्यात आले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गाडीवर लालदिवा काढून टाकला. मुख्यमंत्री कार्यालयाने फडणवीसांचे फोटो ट्वीटरवर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडेंनीही त्यांचा कित्ता गिरवत या निर्णयाचं स्वागत केलं. मंत्र्यांमध्ये लाल दिवे हटवण्यासाठी जणू चढाओढ लागल्याचं चित्र आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/854671157211013120
शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही आपल्या गाडीवर लाल दिवा तातडीनं हटवला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, विजय शिवतरे यांनीही लालदिवा काढून टाकला.



1 मे च्या कामगार दिनापासून व्हीव्हीआयपींचं लाल दिव्याचं कल्चर मोडीत निघणार आहे. यापुढे कुठल्याच मंत्र्यांना लाल दिव्याची गाडी नसेल. पंतप्रधान, मंत्री आणि अधिकाऱ्यांचे लाल दिवे आता कायमचे बंद होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

यापुढे फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजेच रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण पथकाच्या गाड्यांना निळा दिवा असणार आहे. लाल दिव्याबाबत असणारी 108 नंबरची तरतूद काढणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

संबंधित बातम्या:


राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा लाल दिवा कायमचा बंद!