प्रियकराच्या साथीनं इंजिनिअरिंग कॉलेजमधील मैत्रिणीचं अपहरण
एबीपी माझा वेब टीम | 19 Apr 2017 04:08 PM (IST)
बेळगाव: इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्याच मैत्रिणीचे प्रियकराच्या मदतीने अपहरण करुन पाच कोटींची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत गदग येथून अपहरण करण्यात आलेल्या अर्पिता नायकची सुखरूप सुटका केली. तसंच तीन अपहरणकर्त्यांच्या मुसक्याही आवळल्या. अपहरण करणारी दिव्या मालघन ही देखील इंजिनियरिंगची विद्यार्थिनी आहे. दिव्याने आपला प्रियकर केदार पाटील आणि कार चालक सुमित नभापूर यांच्या मदतीने अर्पिताचे अपहरण केले होते. अपहरणाच्या दिवशी दिव्यानं अर्पिताला डिनरला नेलं होतं. तेव्हाच तिल्या झोपेची गोळी घातलेलं नारळ पाणी तिनं दिलं. नारळपाणी प्यायल्यानंतर तिला गुंगी आली. याचाच फायदा घेऊन दिव्यानं आपल्या प्रियकराच्या साथीनं तिचं अपहरण केलं. दरम्यान, याप्रकरणी ठळकवाडी पोलीस स्थानकात अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.