औरंगाबाद : यापुढे फुकटात वीज मिळणार नाही, नाहीतर महावितरण बंद होईल अशा शब्दात राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊतांनी (Nitin Raut) इशारा दिला आहे.औरंगाबादमध्ये आयोजित महावितरणाच्या (Mahavitran) बैठकीसाठी आलेल्या नितीन राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.  आज शेतकरी वीज बिल प्रश्नावरून भाजप आमदार प्रशांत बंब आणि हरिभाऊ बागडे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची महावितरण कार्यालयात बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांकडून थकीत बिल वसुली करू नये अशी मागणी भाजप नेत्यांनी केली. मात्र वीज बिल भरावे लागेल अशी भूमिका राऊत यांनी घेतली आहे. या पुढे वीज कोणालाही फुकट देणार नाही. वीज वापरायची असेल तर पैसे द्यावेच लागतील. कोळसा आणि बँकेचे घेतलेले पैसे भरायचे आहेत. फुकट वीज दिली तर महावितरण बंद पडेल असे राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.  वीज निर्मिती क्षेत्रात खाजगी कंपन्या येऊ द्यायच्या असतील तर राज्य सरकार ठरवेल, असेही राऊत म्हणाले .


शेतकऱ्यांना वीज बिलात सूट देण्याची मागणी होत असल्याच्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, वीज कुणालाच फुकट मिळणार नाही. विजेचे वापर करत असाल तर वीजबिल सुद्धा भरावेच लागेल. कारण महावितरण फुकटात वीज विकत घेत नाही किंवा कोणत्याही कंपन्या महावितरणला वीज फुकट देत नाही.वीज विकत घेण्यासाठी महावितरणला पैसे लागतात वेळ पडल्यास कर्जही घ्यावे लागते. जर महावितरणकडे पैसेच नसणार तर महावितरण बंद होऊन जाईल. मग महावितरण काम करणार नाही त्यावेळी खाजगी कंपन्या उपलब्ध कराव्या लागतील. आणि खाजगी कंपन्याच हव्या असतील तर मला काहीही हरकत नाही, असं राऊत म्हणाले.


तर पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ज्या कंपन्या वीज निर्मिती करतात त्यांना कोळसा विकत घ्यावा लागतो, बँकेचे कर्ज विकत घ्यावे लागते. त्यामुळे वीज तयार करण्यासाठी पैसे लागतात आणि पैसेच नसेल तर वीज कशी तयार होईल असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.


तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो... प्रशांत बंब भाजप आमदार
ओल्या दुष्काळात शेतकऱ्यांनी वीज वापरली नाही, शेतकरी चालू बिल भरायला तयार आहे मात्र थकीत बिल भरायला लावणे चूक असल्याचे भाजप आमदार भाजप आमदार बंब यांनी सांगितलं. 8 तास लाईट मिळत नाही मग कुठून बिल भरायचे. शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे. जर रोहित्र बंद केले तर आम्हाला मोठा मोर्चा काढावा लागेल.  कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नका असा इशारा बंब यांनी दिला.


मराठवाड्यात 1,9346 कोटी रूपयांची थकबाकी


मराठवाडयातील औरंगाबाद, लातूर आणि नांदेड परिमंडलातील  सर्व वर्गवारीतील 27,54,357 वीज ग्राहकांकडे 19,346.35 कोटी रूपयांच्या थकबाकीचा डोंगर आहे. महावितरणला मोठया आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. म्हणून वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.


महावितरण घरगुती, व्यापारी, औघोगिक, पाणी पुरवठा, पथदिवे, कृषीपंप व इतर वीज ग्राहकांना महानिर्मितीसह इतर खाजगी वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करून वीज पुरवठा करते. या खरेदी केलेल्या विजेचे दरमहा पैसे महावितरण संबंधितांना अदा करते. तसेच विजेच्या वहनाचा खर्च, पायाभूत सुविधांची निर्मिती, देखभाल दुरूस्ती, कर्ज व त्याचे व्याज,  व्यवस्थापन व दैनंदिन खर्च करावे लागते. विकलेल्या विजेचे पैसे दरमहा वसूल होत नसल्यामुळे थकबाकीचा डोंगर वाढतच गेला. तसेच कोरोना कालावधीत थकबाकी वाढतच गेली. त्यामुळे महावितरणला आर्थिक  कठिण समस्येला सामोरे जावून महावितरणचा गाडा चालविणे अवघड झाले आहे. म्हणून चालू वीज बिलासह थकबाकी वसूल करणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha