मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अनेक वर्षांपासूनचे सहकारी दिलीप वळसे पाटील यांनी पवारांच्या राज्यातील वर्चस्वाबाबत केलेल्या भाष्यामुळे गदारोळ उडाला. मात्र, आपण टीका केली नसून खंत व्यक्त केली असल्याचे राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. आमचा इतका मोठा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्रातील जनतेने ज्या खंबीर पणाने त्यांच्या मागे उभं रहायला पाहिजे होतं ते घडलं नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. दिलीप वळसे पाटील यांनी केलेले वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, या वक्तव्यावर टीका होऊ लागल्यानंतर वळसे पाटील यांनी आज सकाळी एका व्हिडीओ द्वारे स्पष्टीकरण दिले
वळसे पाटील यांनी काय स्पष्टीकरण दिले?
मी शरद पवारांविषयी असे उद्गार काढलेले नाहीत. माझं म्हणणं असं होतं की गेली ४० ते ५० वर्षे शरद पवारांनी या राज्यासाठी, देशासाठी काम केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातले अनेक पक्ष स्वतःच्या हिंमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसले आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या मागे उभी केली नाही याची मला खंत आहे. मी खंत व्यक्त करत होतो, त्यात शरद पवारांना कमी लेखण्याचा किंवा काही चुकीचं बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.
अजित पवार गटाकडून समर्थन
शरद पवारांच्या राजकीय सामर्थ्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठू लागली. मात्र, अजित पवार गटाने आपल्या नेत्याच्या वक्तव्याचे समर्थन केले. दिलीप वळसे पाटील यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. शरद पवार यांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठिंबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत असल्याचे ट्वीट अजित पवार गटांकडून करण्यात आले आहे. त्याशिवाय, बंडापूर्वी राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिपही ट्वीट करण्यात आली आहे.