Nitin Gadkari : पुणे (Pune) ते नाशिक (Nashik) मार्गावर वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक फाटा त खेड या 30 किमी रस्त्यालगत इलिव्हेटेड हायवे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. म्हणजेच हा रस्ता आता डबलडेकर होणार आहे. गडकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. नाशिक फाटा ते खेड रस्त्याची जुनी निविदा रद्द करण्यात आली आहे.


कसा असेल हा इलिव्हेटेड महामार्ग?


नितीन गडकरी यांच्या माहितीनुसार, पुणे ते नाशिक मार्गावर वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन पुढील 40 वर्षांचा विचार करून आराखडा तयार केला जात आहे. आता या मार्गावर इलिव्हेटेड म्हणजेच दोन मजली रस्ता केला जाणार आहे. माहितीनुसार, खाली रस्ता, पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावर प्रत्येकी सहा मार्गिका असणार आहेत. पुणे ते शिरूर आणि अहमदनगर, औरंगाबाद या जुन्या रस्त्यावर तीन मजली रस्त्याच्या आराखड्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर तळेगाव ते शिरूर हा मार्ग करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबईकडून येणारी वाहने त्या दिशेने वळवता येणार आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर-नगर या रस्त्याचेही आराखडे बनवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. 


मेट्रोसाठीची तरतूद 
गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलंय, यामध्ये मेट्रोसाठीची तरतूद करण्यात आली  आहे. यासंदर्भातील डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असून अहवाल निश्चितीनंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल.


या ठिकाणी इलिव्हेटेड रस्ते बांधणार- गडकरी


गेल्या आठवड्यात पुण्यातील चांदणी चौकातील रस्त्याच्या कामाची पाहणी नितीन गडकरी यांनी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले होते की, पुणे ते शिरुर आणि अहमदनगर ते औरंगाबादच्या जुन्या रस्त्यावर 3 मजली इलिव्हेटेड रस्ता बांधणीचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे ते शिरुर यादरम्यानही अशाचप्रकारे रस्ता तयार केल्यास मुंबईवरुन येणारी वाहतूक वळवता येईल. नाशिक फाटा ते खेड या रस्त्याच्या कामाची पाहणी करणार आहे. त्याठिकाणीही इलिव्हेटेड रस्ता पुढील 30 ते 40 वर्षांचा विचार करुन करण्यात येईल. तसेच पुणे शहराजवळ चाकण एमआयडीसीलगत पावलेवाडी येथे 180 हेक्टर मल्टी स्टोरेज लाॅजिस्टिक पार्क देखील तयार करण्याचे नियोजन आहे. रेल्वेद्वारे मालवाहतूकीचे ट्रक त्याठिकाणावरुन जातील. पुण्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरु करण्याचा विचार आहे. असं गडकरी म्हणाले


संबंधित बातम्या


एका स्कूटरवर आम्ही चार जण, तरुणपणी मीही मोडले नियम: नितीन गडकरी


Nitin Gadkari : कृषी विकासदर 22 टक्क्यांवर आणायचाय, त्यासाठी कृषी संशोधनाची माहिती क्षेत्रीय भाषेमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा : गडकरी