अहमदनगर : अहमदनगरच्या गुंडेगावमध्ये चाललेली लगबग तुम्हाला कदाचित एखाद्या लग्नाची तयारी वाटेल, मात्र गावात पहिलीवहिली बस सुरु झाल्याचा हा आनंद आहे. या आनंदाचे नायक आहेत राजाराम भापकर गुरुजी अर्थात महाराष्ट्राचे मांझी.
महाराष्ट्राच्या या मांझीची ओळख 'एबीपी माझा'ने जगाला करुन दिली होती. आयुष्यभराची जमापुंजी खर्च करुन गुरुजींनी गावात रस्ते तयार केले. माझानं त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना माझा सन्मान पुरस्कारानं सन्मानित केलं.
पुरस्कार मिळाला तरी गुरुजींचं काम संपलं नव्हतं. रस्ते तयार करण्यासोबत गावातून पुण्याला बस सुरु करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. अखेर सततच्या पाठपुराव्यानंतर हे स्वप्न सत्यात उतरलं.
भापकर गुरुजींच्या प्रयत्नानं गुंडेगावच नव्हे तर बेलवंडी फाट्यापर्यंतच्या प्रत्येक गावाला फायदा होणार आहे. गावागावांमध्ये नागरिक त्यामुळेच बसचं मोठ्या आनंदानं स्वागत करताना दिसत आहेत.
राजाराम भापकर गुरुजींचं वय वर्षे 87 आहे. खरंतर हे सामाजिक जीवनातून निवृत्तीचं वय. मात्र याही वयात त्यांनी आपल्या कार्यानं एक नवा आदर्श निर्माण केला आहे.