Maharashtra Karnataka Border Dispute  : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या (Maharashtra Karnataka Border Dispute) मुद्यावरुन महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केली आहे. अमित शाह हे येत्या 14 डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती खासदारांनी दिली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर परस्पर समन्वयानं तोडगा काढू असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिली.


अमित शाह यांनी खासदारांची बाजू एकूण घेतली


सीमावादाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्यानं वक्तव्य केली जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले जात आहेत. तसेच राज्यातील मंत्र्यांना कर्नाटकमध्ये येण्यापासून रोखलं जात आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार देशात कुठेही जाण्याचा हक्क आहे. याला अडकाठी केली जात आहे. याबाबतच्या सर्व तक्रारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगितल्याची माहिती अमोल कोल्हे यांनी दिली. अमित शाह यांनी खासदारांची बाजू संवेदनशीलपणे एकूण घेतल्यामुळं त्यांचे अमोल कोल्हे यांनी त्यांचे आभार मानले.


बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर या सगळ्या सीमाभागात आपला मराठी बांधव आहे. या मराठी बांधवांवर सातत्यानं अत्याचार होत आहेत. त्यांच्यावर कानडी वरवंटा फिरवला जात आहे. या सर्वांवर कधीतरी चाप बसेल अशी अपेक्षा असल्याचे कोल्हे यावेळी म्हणाले. काल गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेटीची वेळ मागितली होती. पण त्यांच्या व्यस्त कामामुळं काल भेट झाली नाही. पण आज त्यांनी वेळ दिली होती. त्याप्रमाणं आम्ही त्यांची भेट घेतल्याचे कोल्हे यावेळी म्हणाले.


सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येणं गरजेचं : राजन विचारे


छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येणं गरजेचं होतं. पण दुर्दैवाने तसे झाले नसल्याचे शिवसेना खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare) म्हणाले. आम्ही बोलत असताना सभागृहात माईक बंद करण्याचे काम सुरु असल्याचेही विचारे म्हणाले.


अमित शाह यांच्याकडून तोडगा काढण्याचं आश्वासन


आपल्या मातीचा आपल्या राज्याचा विषय आहे. त्या विषयावर सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन राज्याच्या हितासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. इतर राज्यातील खासदार देखील पक्षीय मतभेद विसरुन एकत्र येतात. मग या सीमावादाच्या प्रश्नावेळी सर्व खासदार एकत्र यायला हवे होते असे अमोल कोल्हे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुद्यावर बोलताना माईक बंद करण्यात आल्यानंतर अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला. गृहमंत्री अमित शाह यांनी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांच्या आश्वासनाचे काय होते ते पाहणं गरजेचं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद मिटवण्यासाठी मराठी बांधव पंतप्रधान मोदींना पाठवणार 11 हजार पत्रं