Maharashtra Corona Lockdown : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. कडक निर्बंध, थोडी सूट असं चालणार नाही. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही. उद्या टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर याबद्दल निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेतली.


या बैठकीनंतर काही महत्वाच्या राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


महाविकास आघाडी सरकारचं जे काही नियोजन आहे, ते तुम्ही लोकांसमोर मांडा. विरोधी पक्ष संपर्ण सहकार्य करेल. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.


जवळपास दोन तासांपेक्षा अधिक वेळ मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेतली. कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध की लॉकडाऊन यावर ही चर्चा झाली. आजच्या बैठकीत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मात्र, लॉकडाऊन करण्याअगोदर सर्वसामान्यांच्या बाबतीत विचार करावा, त्यांना मदतीची तरतूद करावी, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली, अशी माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली.


राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे यावर गांभीर्याने विचार केला जात आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेकांना फटका बसणार आहे, त्यामुळे निर्णय घेताना या सर्वांचा विचार केला जाणार आहे. केंद्र सरकारसारखा घाईघाईने निर्णय घेतला जाणार नाही. अशीच भूमिका मुख्यमंत्र्यांचीही आहे. यावर सर्वांचंच एकमत झालं आहे. कोरोनाला रोखणे सध्या गरजेचं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. परिणामी काही दिवस लॉकडाऊन लावावा लागणार आहे. मात्र, हा लॉकडाऊन जास्त दिवसांचाच नसेल. हळूहळू पुन्हा यातील निर्बंध शिथील करणार आहे, अशी प्रतिक्रिया बैठकीतनंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिलीय.


महामारीतून महाराष्ट्र बाहेर काढायचा आहे, पण राजकारण होता कामा नये. राज्याने निर्णय घ्यावा पण लॉकडाऊन केल्यास मदत जाहीर करावी ही भूमिका काँग्रेसची आहे. लसीकरणाला, रेशनिंग लावण्याचे पाप केंद्राने केले आहे,  भाजप विरोधी राज्याला कमी लसी दिल्या आहेत. अगोदर लसी कमी देऊन राज्याने लसी खराब केल्याचा आरोप केला आहे, पण महाराष्ट्रात 3 टक्के लसी खराब झाल्यात यूपीत 9 टक्के लसी वाया गेल्या आहेत. पण मृत्यूचे राजकारण होता कामा नये, भाजपची भूमिका चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली.