Maharashtra Live Update : लोकसभा निवडणुकीच्या आज सहाव्या टप्प्याचं मतदान, राज्यातील तसेच देशातील बातम्यांचा वेगवान आढावा वाचा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 May 2024 02:21 PM
Yavatmal News : उष्णतेचा पारा 44.5 अंशावर, मागील पाच वर्षांतील उच्चांक

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात पारा 44.5 अंशावर पोहोचला आहे त्यामुळे आता नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. गेल्या आठ दिवसानंतर हवामानात बदल झाल्यानंतर उष्णतेची तीव्रता अधिक वाढल्याने आज पारा 44.5 डिग्रीवर पोहोचला असल्याने नागरिकांना बाहेर पडताना टोपी आणि शेल्याचा वापर करावा लागत आहे. उन्हाची लाई होत असताना आता ज्यूस आणि रसवंतीवर गर्दी होताना दिसून येत आहे. दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत. अवकाळी वादळी पावसानंतर जिल्ह्यात एकदमच उष्णतेची लाट वाढली आहे. मागील पाच वर्षातील उष्णेतेने उच्चांक गाठला आहे.

Gadchiroli News : अहेरी-अमरावतीत बसचा अपघात; वाहकासह दोन महिला गंभीर जखमी

Gadchiroli News : अहेरी-अमरावती बसचा अपघात.. वाहकासह दोन महिला गंभीर जखमी आलपल्ली-आष्टी  मार्गावरील धंनूर फाट्यावरील घटना घडली आहे.. अहेरी आगाराची बस क्रमांक एम एच-07 सी 9463 ही अहेरी वरून 27 प्रवासी घेऊन अमरावतीच्या दिशेने ही बस जात होती. धंनूर फाट्यावरील वनविभागाच्या नाक्याजवळ समोरून येत असलेल्या वाहनाला साईड देण्याच्या दरम्यान बाजूला खोल भाग असल्याने बस पलटली. जखमींना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या बसमध्ये वाचकाची मुलगी देखील प्रवास करत होती. तिलाही दुखापत झाली आहे. घटनास्थळी अहेरी आगारचे पथक दाखल झाले आहे. 

Maharashtra News : अश्लील रील केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात 294 बी, 501, 67 आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल

Maharashtra News : अल्पवयीन आरोपीच्या दिसण्याचे साधर्म्य ठेऊन अश्लील रील केल्याप्रकरणी आणि ते प्रसारित केल्याप्रकरणी करणाऱ्यांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात 294 बी, 501, 67 आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon News : जळगावात उन्हाचा पारा 47 अंशावर; उष्माघाताने 100 मेंढ्या मृत्यूमुखी
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमान 47 अंशावर जाऊन पोहोचले आहे. या वाढत्या तापमानाचा फटका आता केवळ शेती पिकांना बसतो आहे असे नव्हे तर मुक्या जीवांना देखील बसू लागला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा गावात मेंढपाळ कुटुंबियांच्या शंभरहून अधिक मेंढ्या या उष्माघातामुळे मरण पावल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांना नुकसानग्रस्त मेंढपाळ कुटुंबीयांना मदतीचे आवाहन केले आहे. 

 
Maharashtra News : मोठी बातमी : दहावीचा निकाल 27 मे रोजी, दुपारी 1 वाजता जाहीर होणार

Maharashtra News : मोठी बातमी : दहावीचा निकाल 27 मे रोजी, दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल दरवर्षीप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही धाकधूक वाढली आहे.   

Beed News : ज्ञानराधाच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा; जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीशांचा आदेश
Beed News : बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्याकडून वारंवार ठेवी देण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु,अनेक तारखा देऊनही ठेवी परत मिळाल्या नाहीत. या प्रकरणी ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळासह अधिकाऱ्यांवर तीन प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. टी.डोके यांनी शिवाजी नगर पोलिसांना दिले आहेत.

 

बीड मधील अमोल वळे, रवींद्र बहिर आणि सुधाकर धुरंधरे यांनी ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये आपल्या ठेवी ठेवल्या होत्या. ठेवींवर आकर्षक व्याज परतावा दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु ठेवींचा कालावधी पूर्ण होऊनसुद्धा ठेवी आणि त्याचा लाभ मिळाला नाही.

 

अध्यक्षांसह उपाध्यक्ष आणि इतरांनी फसवणूक केली. मल्टिस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे हे मागील सात महिन्यांपासून फरार आहेत. फक्त ऑनलाईन व्हिडिओद्वारे समोर येतात आणि तारीख देतात. परंतु सुरेश कुटे यांनी दिलेल्या तारखेला कधीच पैसे वाटप केले नाही. त्यामुळे तिन्ही ठेवीदार गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले, परंतु तेथे गुन्हा दाखल करून घेतला नाही. 

 

त्यामुळे या तिघांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळासह अधिकाऱ्यांवर तीन प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिवाजीनगर पोलिसांना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. टी.डोके यांनी दिले आहे.
Mumbai News : मुंबईत येत्या 30 तारखेपासून 5 टक्के पाणी कपात, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन 

Mumbai News : मुंबईमध्ये येत्या 30 तारखेपासून 5 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 5 जूनपासून मुंबईमध्ये 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. जलाशयांमधील पाणीसाठी घटल्याने खबरदारी म्हणून पालिकेने हा निर्णय घेतला आहे. 

Maharashtra News : वेंगुर्ले बंदर दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले

Maharashtra News : वेंगुर्ले बंदरात खलाश्यांना घेऊन बोट पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले आहेत. काल दोन तर आज दोन मृतदेह सापडले आहेत. बोट बुडून मृत झालेले चार पैकी तीन मध्यप्रदेश तर एक जण रत्नागिरी मधील खलाशी होते. आझाद मुनीलाल कोल, चांद गुलाल महमद, शिवराम कोल हे तिघे मध्य प्रदेश मधील तर महादेव शंकर आंबेरकर हा रत्नागिरीमधील खलाशी वेंगुर्ले येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून कामाला होते.

Pune News : अल्पवयीन मुलीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक, ड्रायव्हरला धमकावल्याचा, डांबून ठेवल्याचा आरोप

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.अपघात झाला तेव्हा आरोपीच्या शेजारी गंगाराम पुजारी नावाचा ड्रायव्हर बसला होता त्याला धमकी दिल्याचा आणि डांबून ठेवल्याचा आरोप सुरेंद्र यांच्यावर आहे. 


 

Kolhapur News : कोल्हापुरात निवासी शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Kolhapur News : कोल्हापुरात निवासी शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका निवासी शाळेतील वसतिगृहात ही घटना घडली आहे. चार दिवसांपूर्वी निवासी शाळेतील बारावीत प्रवेश घेतलेल्या अभय देवकाते या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. वहीमध्ये जुन्या शाळेतील 13 मित्र मैत्रिणींची नावे त्याने आपल्या वहीत लिहीली आहेत. सर्व मित्र-मैत्रिणीची आठवण येत असून तुम्ही सर्व माझे बेस्ट फ्रेंड आहात असा केला उल्लेख त्याने वहीत केला आहे. दरम्यान, आत्महतेची पन्हाळा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. हा विद्यार्थी मूळचा बारामतीचा आहे. 

Maharashtra News : धाराशिवच्या येवती गावात वादळी वाऱ्यामुळे दोन एकरातील केळी पिकाचे नुकसान, हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी संकटात

Maharashtra News : धाराशिवच्या येवती गावात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून गावातील शेतकरी श्रीकृष्ण पडुळकर यांच्या दोन एकरावरील केळी बागेचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे 10 ते 15 लाख रुपयांचं नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास या वादळी वाऱ्यामुळे धुळीला मिळाला आहे. दरम्यान केळीची बाग जोपासण्यासाठी टॅंकरने पाणी दिलं आहे. मात्र, आता काढायला आलेल्या या केळीची बाग जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी पडुळकर यांनी केली आहे.

Jammu-Kashmir News : काश्मीरच्या अनंतनागमध्ये मेहबूबा मुफ्तींचं धरणं आंदोलन, पीडीपी कार्यकर्त्यांना रोखलं जात असल्याचा आरोप 

Jammu-Kashmir News : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये मेहबुबा मुफ्ती यांचं सध्या धरणे आंदोलन सुरु आहे. पीडीपी कार्यकर्त्यांना अनंतनागमध्ये रोखलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पीडीपी कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बंद केलं जातंय असं मुफ्ती यांचं म्हणणं आहे. 

Mumbai News : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर दादर परिसरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई, मुंबई महानगरपालिका अॅक्शन मोडवर 

Mumbai News : मुंबईतल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर दादर परिसरातील सर्व मोठ्या होर्डिंग्सवर मुंबई महानगरपालिका कारवाई करताना पाहायला मिळतेय. 40 बाय 40 फूट पेक्षा मोठ्या आकाराची आणि नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेले होर्डिंग करण्यात यावी यासाठी मुंबई महापालिकेने संबंधित प्राधिकरणाला कंपन्यांना नोटीस बजावली होती. मात्र, नोटीस बजावूनसुद्धा कुठल्याही प्रकारे पावले उचलली जात नसल्याने महानगरपालिकेने हे पाऊल उचललं आहे. दादरसह घाटकोपर आणि मुंबई उपनगरमध्ये देखील प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. 

Maharashtra News : रेवस रेड्डी अलिबाग विरार सागरी मार्ग आता फास्ट ट्रॅकवर; प्रशासनाकडून प्रकल्पाला हिरवा कंदील 

Maharashtra News : रेवस रेड्डी अलिबाग विरार सागरी मार्ग आता फास्ट ट्रॅकवर घेण्यात येणार आहे. प्रशासनाकडून प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहेत. मुंबई ते सिंधुदूर्ग प्रवास वेगवान करण्यासाठीं सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. रेवस रेड्डी सागरी महामार्ग कामातील निविदा बांधकाम कंपन्यांना सुपूर्द करण्यात आलं असून 447 किमी लांबीचा सागरी महामार्गावर 8 प्रमूख सागरी पुलांचा सामावेश असणार आहे. त्यामुळे लवकरच कामांना गती येणार आहे. 

Hingoli News : हिंगोलीत खंदारबन परिसरात दोन दुचाकीला बोलेरो धडकून भीषण अपघात; एक जण जागीच ठार तर दोन जण जखमी

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरालगत असलेल्या जवळा खंदारबन रोड परिसरामध्ये रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या दोन दुचाकीला बोलेरो धडकली असून या अपघातामध्ये एक जण ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. रात्री साधारणतः नऊ वाजताच्या सुमारास वसमत शहरातील जवळा खंदारबन रोड परिसरामध्ये भरधाव वेगाने वसमच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरोने दोन दुचाकीला धडक दिली असून या अपघातामध्ये माधव क्षीरसागर हा 30 वर्षाचा तरुण जागीच ठार झाला असून दोघेजण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू असून मयताच्या नातेवाईकाने आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यासाठी रात्री पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. 

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी देशात आज 58 जागांसाठी मतदान पार पडणार; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी देशात आज 58 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 58 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, बांसुरी स्वराज, राज बब्बर आणि कन्हैया कुमार हे नेते रिंगणात आहेत. विशेषतः मेहबुबा मुफ्ती, मनेका गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. या टप्प्यात बिहारच्या आठ, हरियाणाच्या सर्व दहा, झारखंडच्या चार, दिल्लीच्या सर्व सात, ओडिशाच्या सहा, उत्तर प्रदेशच्या 14, पश्चिम बंगालच्या आठ आणि जम्मू आणि काश्मीरच्या एका जागेवर मतदान होत आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील आजच्या ठळक बातम्या... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.