Maharashtra Rain Live : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, ठाणे-पालघरला मंगळवारी यलो अलर्ट
Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घ्या एका क्लिकवर. मुंबई आणि पुण्यात जोरदार पाऊस
पार्श्वभूमी
पुणे जिल्ह्यातील मावळमधील कुंडमळा इथं पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. याचं रेस्क्यू ऑपरेशन काल रात्री 10 वाजता थांबविण्यात आलं, ते आज सकाळी 7 वाजता पुन्हा एकदा सुरु करण्याचं नियोजन प्रशासनाचं...More
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील धामणी इथं एका घरात अडकलेल्या व्यक्तीचे पोलिसांकडून रेस्क्यु करण्यात आलं आहे. शास्त्री नदीला पूर आला असून बाळकृष्ण पवार यांच्या घराला पुराचा वेढा पडला होता. त्यामुळे घरी असलेली माणसे अडकून पडले. लहान मुलांसह चार माणसांचे संगमेश्वर पोलिसांकडून रेस्क्यु करण्यात आलं.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील धामणी इथं एका घरात अडकलेल्या व्यक्तीचे पोलिसांकडून रेस्क्यु करण्यात आलं आहे. शास्त्री नदीला पूर आला असून बाळकृष्ण पवार यांच्या घराला पुराचा वेढा पडला होता. त्यामुळे घरी असलेली माणसे अडकून पडले. लहान मुलांसह चार माणसांचे संगमेश्वर पोलिसांकडून रेस्क्यु करण्यात आलं.
रायगड जिल्ह्यातील दोन नद्यांनी इशारा पातळी गाठल्याची माहिती समोर येत आहे.तर तिकडे नागोठणे शहराजवळ असणारी आंबा नदी इशारा पातळी ओलांडून शिवकालीन वरवटणे पुलाला टेकल्याने नागोठणे शहराला जोडणारा हा पूल रहदारीसाठी करण्यात मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांसह प्रवाशी वर्गासाठी पर्यायी मार्ग म्हणून रोहा नागोठणे बायपास रिलायन्स रस्त्याचा वापर करता येणार आहे.
पुढील काही तासात पावसाचा जोर वाढल्यास वरवटणे पुलावरून पाणी जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. साडेचारशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेला हा पूल दगडी बांधकाम असल्याने कोणत्याही क्षणी कोसळू शकतो अशी भीती आहे.
मुंबई पूर्व उपनगरात गेल्या अर्धा तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पवई, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावर भांडुप जवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी भरल्याने वाहतूक मंदावली आहे. तसेच अंधेरी सब वे पाण्याखाली गेला आहे.
राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास चारही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Rain Update : मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर कोकणातील काही भागात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात परिसरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Mumbai News : वाशी हायवेला लागून असलेल्या वाशी प्लाझा या कमर्शियल सोसायटीची भिंत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. भिंत पडल्याने येथे पार्किंग केलेल्या अनेक टू व्हीलर गाड्या दबल्या आहेत. तर एक टेम्पो देखील यात दबला गेला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.
भिवंडी : महाराष्ट्रभर मराठी शाळांचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भिवंडी तालुक्यातील कवाड गावातील ठाणे जिल्हा परिषद केंद्र शाळेत आज नवीन शालेय इमारतीचे लोकार्पण माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच नव्याने शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
शाळेच्या नवीन इमारतीमध्ये आधुनिक डिजिटल शिक्षण सुविधा, वाचनालय व संगणक कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नक्कीच चालना मिळेल. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज पालघर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. येथील शाळाही अत्यंत आधुनिक पद्धतीने सुसज्ज करण्यात आली असून नववी व दहावीच्या वर्गांची नवी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आता इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. राज्य सरकार शिक्षणाच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे चित्र आजच्या दिवशी राज्यभर दिसून आले.
Pune Accident : चांदणी चौकात अपघाताचं सत्र सुरूच आहे. तेलगळतीमुळे ट्रक पलटी आणि प्रायव्हेट बसने त्या ट्रकला जोरदार धडक दिली. यानंतर जवळपास पाच ते सहा गाड्या एकमेकांना धडकल्या असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातामुळे चांदणी चौकातील वाहतूक ठप्प झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील खंडापूर येथील चारशे पेक्षा अधिक ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन केलं... आज शाळेचा पहिला दिवस.. मागील पाच ते सहा महिन्यापासून येथील शाळेला शिक्षक देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे... पाचवी ते सातवी या वर्गासाठी गणित आणि विज्ञानासाठी शिक्षक उपलब्ध नाही .. गावातील निम्न आर्थिक स्तरातील ग्रामस्थांना आपली मुले महागड्या शाळेत टाकणं शक्य नाही.. या जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या ही भरपूर आहे.. असे असतानाही वेळोवेळी मागणी करूनही शिक्षक उपलब्ध होत नाही... यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी एकत्र येईल थेट जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन करत आपले मागणी मांडली... ग्रामस्थांचा रोष पाहून शिक्षणाधिकारी यांनी काही दिवसातच इथे शिक्षकाची नेमणूक करण्यात येईल असा आश्वासन दिलं...
राज्याच्या आपत्ती विभागाचा 24 तासाचा अहवाल
येत्या 24 तासात रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट तसेच रत्नागिरी , पुणे घाट , सातारा घाट , कोल्हापूर घाट , कोल्हापूर घाट , आणि सिंधुदुर्ग येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलं
राज्यात 24 तासात 18 नागरिकांचा मृत्यू झाला आहे तसेच 65 नागरिक जखमी झालेत
पुणे मावळ येथे घडलेल्या घटनेत 4 मृत्यू आणि 51 जखमी
सार्वधिक पाऊस झालेले जिल्हे
रत्नागिरी - 112 मिमी
सिधुदुर्ग - 110 मिमी
मुंबई शहर - 100 मिमी
मुंबई उपनगर - 86 मिमी
रायगड - 72 मिमी
मेट्रो १ - घाटकोपर ते वर्सोवा जाणाऱ्या मेट्रो ओव्हर हेड वायरमधील तांत्रिक बिघाडामुळे एका जागी थांबून
मागील पंधरा मिनिटांपासून घाटकोपर पासून वर्सोवा स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रो गाड्या या थांबवण्यात आले आहेत
भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील येवई नाक्यावर पावसाचे पाणी साचल्याने महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाण्यातून वाट काढत जावे लागत असल्याने वाहनांची गती मंदावल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे जे काम झाले आहे त्या रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा गटारीत न केल्याने पाणी रस्त्यावर साचलेल्याने वाहन चालकांना पाण्यातून वाहन चालविणे कठीण झाले आहे यामुळे रस्त्यावरील पाणी नाल्यात सोडल्यास महामार्गावर साचलेले पाणी शिल्लक रहाणार नाही.
यवतमाळ मनसेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील अल्पभूधारक व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील 1100 शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात येत आहे. शेतकरी हा बँकेच्या आणि सावकारांच्या पाशात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून हा उपक्रम राबवित आहे.
लागवडीसाठी लागणारे तूर आणि बीटी बियाण्यांचे वाटप शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करण्यात येत आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे शेकऱ्यांचे उन्हाळी पिके धोक्यात आली तर अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना बँकेकडून थकीत कर्ज नाकारण्यात आले त्यामुळे अश्या शेतकऱ्यांना मनसेकडून बियाणे वाटप करण्यात येत आहे.
मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी येथे महामार्ग खचला.
मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला धोका.
वाळंज वाडी येथे असलेल्या ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला काँक्रिट ला मोठे तडे जाऊन रस्ता खाण्यास सुरवात.
खबरदारी म्हणून स्थानिकांनी महामार्गावर टाकल्या झाडाच्या फांद्या.
रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे वाहतूक तत्काळ बंद करण्याची गरज.
तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करुळ घाटामध्ये दरड कोसळली.
करूळ घाटामध्ये मातीचा मलबा आणि दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प.
सिंधुदुर्गातून कोल्हापूर कडे जाणारी करूळ घाटात वाहतूक ठप्प.
वैभववाडीत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका करूळ घाटाला बसला.
करूळ घाटातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.
शेलरवाडी येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू. कुंडमळा येथून एक किलोमीटर पुढं एक बोट नदीत सोडली. खबरदारी म्हणून हे सर्च ऑपरेशन केलं जातंय.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात चांगला पाऊस
तुलसी तलाव क्षेत्रात ६६ मिमी पावसाची हजेरी तर मध्य वैतरणात ६० मिमी पाऊस
विहारमध्ये देखील ४३ मिमी पावसाची हजेरी
पुढील २४ तासात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता
सोबतच, घाट परिसरातही पावसाची जोरदार हजेरी
ताम्हिणी घाटात अतिवृष्टी, ताम्हिणी घाट परिसरात २२० मिमी पाऊस
लोणावळात मागील २४ तासात १२० मिमी पाऊस
कोयना धरण क्षेत्रातही चांगला पाऊस, पोफळी भागात ९१ मिमी पाऊस
डुंगरवाडी भागात देखील मागील २४ तासात १६२ मिमी पाऊस
Beed : बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. कांद्याला 1500 ते 2100 रुपये दर मिळतोय.. अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने कांद्याचे मोठे नुकसान केले आहे. जो शिल्लक चांगल्या दर्जाचा कांदा शेतकऱ्यांकडे आहे. त्याची विक्री बाजार समितीत केली जातेय.
Pune News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पाऊस पडत आहे. मागील २४ तासांत खडकवासला धरणात १८ मिमी, पानशेतमध्ये २५ मिमी, वरसगावमध्ये २६ मिमी आणि टेमघरमध्ये २३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. सद्यः स्थितीत खडकवासला प्रकल्पामध्ये ५.२५ टीएमसी पाणीसाठा असून, हा पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा १.३५ टीएमसी इतका जादा आहे.
वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचे अपहरण करून त्याला लुटण्यात आले आणि नंतर त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिर्डीमध्ये घडली आहे.. यासंदर्भात सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून या घटनेने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे..
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील 42 वर्षीय गणेश सखाहरी चत्तर हे 8 जूनपासून बेपत्ता होते.. त्याच दरम्यान शिर्डी जवळील नांदुर्खी बुद्रुक येथे एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.. मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल 13 जून रोजी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.. मयत व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.. या मृताचा मोबाइल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला. त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा करण्यात आला.. दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाइल यातीलच एका मुलाने विकत घेऊन चालू केला आणि त्यानंतर या खुनाला वाचा फुटली.. गणेश चत्तर हे रस्त्याने पायी जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना उसाच्या कांडक्याने तसेच हाताने मारहाण करून त्यातील एकाने त्यांचा गळा दाबला.. त्याच वेळी दोन जणांनी चाकूने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला.. मृतदेह उसाच्या शेतात टाकत त्यांच्या खिशातील मोबाइल काढून घेतला.. हा मोबाइल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला.. पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली.. यातील काही अल्पवयीन मुले नशेत होती.. त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचे पोलीस तपासात समोर आलंय.. पोलिसांनी सात अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलंय..
उत्तर रत्नागिरी मध्ये चिपळूण गुहागर खेड आणि दापोली परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीये खेडमधील जगबुडी नदीला पूर आल्यामुळे नदीने इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात तर चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात गटारे तुंबल्यामुळे रस्ते पाण्याखाली गेल्याचे प्रकार समोर येत आहेत त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना वाट शोधत प्रवास करावा लागत आहे. गुहागर मधील भादगाव मध्ये दोन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद आहे तर दापोलीमध्ये दाभोळ मार्गावर मोठे झाड कोसळल्यामुळे तो मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
दौंडहून पुण्याला येणाऱ्या डेमू ट्रेनच्या एका डब्यात अचानक आग लागली..
अचानक लागलेल्या आगीमुळे डब्यात मोठ्या प्रमाणात धूर झाला होता आणि एकच गोंधळ उडाला
हा प्रकार गाडीत बसलेले प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
तातडीने या संदर्भातली माहिती स्टेशन मास्तरला देण्यात आली..
मुंबईत आज रात्र पासून जोरदार पाऊस सुरू आहे,
या जोरदार पावसामुळे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली कडून वांद्रे च्या दिशेने जाणारा मार्गावर विलेपार्ले, अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव,मालाड या सर्व परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
खरंतर आठवड्याचा पहिला दिवस आहे मोठा संख्या मध्ये चाकरमाने घरातून कामासाठी निघाले आहे मात्र या वाहतूक कोंडीचा मोठा फटका त्यांना बसत आहे.
विलेपार्ले ते मालाड अर्धा तासाचा प्रवास मात्र या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना दोन ते अडीच तासांमध्ये प्रवास करावा लागत आहे.
वाहतूक कोंडी काढण्याचे प्रयत्न देखील वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे...
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील पावसाने झोडपून काढलं असून जिल्ह्यात सरासरी १०९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक दोडामार्ग तालुक्यात १४२ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर सावंतवाडी मध्ये १३२, वेंगर्ल मध्ये १२९, कुडाळ ११३, वैभववाडी १२२ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असून रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. समुद्राला उधाण असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १५ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टांगा गावाच्या शेतशिवारात रात्री करण्यात आली. या कारवाईत एक दुचाकी, क्रेटा, स्कार्पिओ या वाहनांसह ११ मोबाईल, ४३ हजार रुपये रोख असा एकूण २१ लाख ४८ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्डा चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
सुट्ट्या संपल्या आता आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत शाळेचा पहिला दिवस आहे. शाळांमध्ये आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची लगबग दिसून आलीय. येथील विद्यावर्धीनी विद्यालयात स्वतः शिक्षकांनी ढोल ताशाचा गजर करत विद्यार्थ्यांचे स्वागत केलय.यावेळी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन देखील स्वागत करण्यात आलाय यावेळी शाळेसमोर रांगोळीची सजावट देखील करण्यात आलीय. दरम्यान यावेळी नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह देखील दिसून आलाय.
आषाढ महिना सुरू होताच वारकऱ्यांना वेध लागतात ते विठ्ठल भेटीचे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथून निघणारी स्नेहभाव पालखी ही गेली ३८ वर्षांची अखंड परंपरा जपत यंदाही पंढरपूरकडे रवाना झाली.श्री दत्त मंदिर येथून टाळ-मृदुंगाच्या गजरात, भगव्या पताका खांद्यावर घेत पालखीने नगरप्रदक्षिणा करत सवाद्य वातावरणात प्रस्थान केलं. ही पालखी कै.कैकाडी महाराज आणि ह.भ.प. कै. कोंडीराम काका यांच्या संकल्पनेतून सुरू झाली असून ३३ गावांचा प्रवास करत २१ दिवसांत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरातील कैकाडी मठात पोहोचते. पंचक्रोशीतील असंख्य वारकऱ्यांसाठी ही पालखी वर्षानुवर्षे श्रद्धेची पर्वणी ठरत आहे..
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजच्या दिवशी देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असं आवाहन केलं गेलंय. जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून पावसाने धुवाधार बॅटिंग केलीय. सध्याच्या कडेला पाऊस काहीशी विश्रांती घेतो आणि त्यानंतर बरसतोय. पण एकंदरीत पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामन विभागाचा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊस
दिनांक - 16/06/2025
१) मंडणगड -66.50 मिमी
२) खेड - 107.28 मिमी
३) दापोली - 96.14 मिमी
४) चिपळूण - 128.33 मिमी
५) गुहागर - 136.80 मिमी
६) संगमेश्वर - 129.50 मिमी
७)रत्नागिरी - 99.77 मिमी
८) लांजा - 139.60 मिमी
९) राजापूर - 118.00 मि मि
आजचा एकूण पाऊस = 1021.92 मिमी
आजचा एकूण सरासरी पाऊस -113.54 मिमी.
परभणी: शेगाव हुन पंढरीनाथाच्या भेटीला निघालेली संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची पालखी आज परभणीत दाखल झालीय.भगवी पताका घेतलेले ७०० वारकरी,३ अश्व,टाळ मृदूंगाचा गजर करत शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत आहेत.श्रीची पालखी परभणीत दाखल झाली यावेळी परभणी करांनी मोठ्या उत्साहात पालखीचे ठिकठिकाणी स्वागत केले,कुठे पुष्पवृष्टी कुठे,प्रसाद,फळे वाटप भाविकांनी केले.परभणीत पालखी दाखल होताच पूर्णा नदीवरील पुलावर पालखीचे अतिशय सुंदर असे पालखीचे रूप पाहुयात ड्रोनच्या माध्यमातून टिपले आहेत.
गुहागर मधील भातगाव येथील वडाची वाडी येथे रस्त्यावर आली दरड.
दरड कोसळल्यामुळे मोठ मोठे दगड मुख्य मार्गावर आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा.
ग्रामीण भागातून शाळेत जाणारी मुलेही वाहतुकी अभावी खोळंबली....,
गुहागर मध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचे सत्र सुरूच....
मुसळधार पावसामुळे नदीजवळील भात शेती पाण्यात
पेरणी केलेलं भात पीक पाण्याखाली
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
गुहागर मधील भातगाव येथील वडाची वाडी येथे रस्त्यावर आली दरड.
दरड कोसळल्यामुळे मोठ मोठे दगड मुख्य मार्गावर आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा.
ग्रामीण भागातून शाळेत जाणारी मुलेही वाहतुकी अभावी खोळंबली....,
गुहागर मध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचे सत्र सुरूच....
नागपूर जिल्ह्यात गाजत असलेल्या बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. विठ्ठल-रुख्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप धोटे यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासात प्रत्येक शिक्षकाकडून १५ लाख रुपये नोकरी लावण्यासाठी घेण्यात आल्याचे समोर आले असून, हे पैसे दिलीप धोटे यांनी घेतल्याचा एसआयटीला संशय आहे. अटक करण्यात आलेले दिलीप धोटे हे मोहपा (ता. कळमेश्वर) येथील भाजपचे स्थानिक नेते आहेत.
ठाण्यातील रघुनाथ नगर परिसरात मित्तल पार्क या ठिकाणी प्रकृती पार्कच्या इमारतीतील १० व्या मजल्यावरील डुप्लेक्स रूममध्ये अचानक लागली आग..
आगीच कारण अस्पष्ट..
आग लागल्याने घरातील फर्निचर इलेक्ट्रिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य व वायरिंग जळून मोठ्या प्रमाणात नुकसान..
या घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून २२:४० वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
या घटनास्थळी अडकलेल्या रूम मालक ओझस रमेश मोहिलेदेवा (पु / २४ वर्षे) त्यांच्या घरात एक पाळीव कुत्रा हे रूममध्ये अडकला होता त्या दोघांनाही बाहेर काढण्यात आले असून ओझस मोहिलेदेवा यांच्या पाठीला किरकोळ भाजले असून उपचाराकरिता ज्युपिटर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
मुंबईत जोरदार पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत.
कल्याण डोंबिवली परिसरात मध्यरात्री पाऊस सुरू होता. सकाळपासून पाऊस काहीसा थांबला असला तरी रिपरिप पाऊस सुरु आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे
लांजा तालुक्यात जोरदार पाऊस
कुवे भागात ओहळचं पाणी रस्त्यावर
पावसाचा जोर वाढण्याचा हवामान विभागचा अंदाज
सिंधुदुर्गात रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं असून आता देखील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत आहे, तर दुसरीकडे समुद्र देखील खवळलेला आहे. किनाऱ्यावर ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे, तरीदेखील काही मच्छीमार आपला जीव धोक्यात घालून मासेमारी करत आहेत. रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले आमदार महेंद्र दळवी आणि भाजपचे दिलीप भोईर आता एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः आमदार महेंद्र दळवी यांनी जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसाला हे भाकीत केले आहे . इथे 21 जूनला भाजपचे दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्यामुळे अलिबागचा राजकारणात वेगळी घडामोड होणार असल्याची माहिती आमदार दळवी यांनी दिली. त्यामुळे दिलीप भोईर यांच्या शिंदे गटाच्या पक्षप्रवेशामुळे त्यांचा राजेशाही प्रवास आत्तापासून खऱ्या अर्थाने सुरू होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटलं.
- गडचिरोलीच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील 120 विद्यार्थी पहिल्यांदाच विमानातून बंगळूरूच्या इस्रो भेटीला रवाना झाले
- नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले
- यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत 'खूप अभ्यास करा, यशस्वी व्हा' अशी प्रेरणा दिली
- गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अवकाश क्षेत्राची ओळख व्हावी यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात आला
- या उपक्रमाची संकल्पना सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी मांडले होते, जिल्हाधिकारी पांडा यांनी तात्काळ मान्यता दिली
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आवश्यक निधी मंजूर करून विद्यार्थ्यांचा स्वप्नांना आकाशभरारी दिली
- सिरोंचा, वांगेपल्ली आणि नवेगाव येथील निवासी शाळांमधील हे विद्यार्थी पहिल्यांदाच विमानातून इस्रो भेटीला रवाना झाले
रत्नागिरी- रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस
पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील लांजा डेपोजवळ पाणी आलं रस्त्यावर
रस्त्यावर पाणी तरी वाहतुकीवर परिणाम नाही
ठेकेदाराच्या दर्जाहीन कामामुळे पाणी रस्त्यावर
लांजा एसटी स्टँड परिसरातील रस्त्यावर आहे पाणी
मुंबईत रात्रीपासून पावसाच्या सरी. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस
पाऊस आणि वाऱ्याने दादर शिवसेना परिसरातील बॅनर्स पडले
राज्यभरात वाहन अपघातात वाढ होत असताना बुलढाणा जिल्ह्यातही अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढला आहे गेल्या पाच महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात ३२० अपघातात १८२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नैसर्गिक मृत्यूपेक्षा अपघातातील मृत्यू जास्त असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या पाच महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर १५ अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे आणि या सर्व मृत्यूचे कारण अतिवेग, नियमांच पालन न करणे हे ठरलं आहे. अतिशय रुंद व चकाचक रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने व त्यात नागरिकांचे जीव जात असल्याने आता चिंता वाढली आहे त्यामुळे परिवहन विभाग , वाहतूक पोलीस यांनी सक्रिय होण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील द्वारका वॉटर पार्क येथील बाऊन्सर आणि सुरक्षारक्षक यांच्याकडून पर्यटकांना लाठीकाठी मारहाण .. तब्बल दीड तास एका रूम मध्ये ठेवले कोंबून कोंबून ... पीडित परिवाराकडून पोलिसात तक्रार देण्यात येत आहे. पोलिसांचा तपास सुरु ..
कुंदमाळ्यातील दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू.. तर आणखीन दोन ते तीन जण बेपत्ता असण्याची शक्यता.. आतापर्यंत एकूण 50 पर्यटकांना वाचवण्यात यश.. त्यातील आठ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार.. इतर 32 जण किरकोळ जखमी.. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तळेगावातील मायमर रुग्णालयात मूळ अकोल्याचा आणि चाकणमध्ये काम करणारा विजय येणकर याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरु आहेत.
मंत्री संजय राठोड यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाचा अपघात झालाय मंत्री . संजय राठोड यांनी यानंतर जखमी पोलिसांची अकोल्यात भेट घेतली. या जवानांना अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होतेय. जखमी पोलिसांसोबत संजय राठोड यांनी प्रकृती बाबत चर्चा केलीय.. अकोल्यातील बोरगाव मंजूजवळ पोलीस वाहनाचा अपघात झाला होताय. या अपघातात 4 पोलीस शिपाई जखमी झाले होते . जखमी पोलीस शिपायांवर अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. पोलिसांच्या गाडीचे समोरील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने अपघात झाला. मंत्री संजय राठोड जखमी पोलीस शिपायांच्या भेटीसाठी आले होते
मुंबईत रविवारी रात्रभर जोरदार पाऊस झाला आहे. सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. अद्याप मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलेले नाही. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागांमध्ये पाणी साचून रस्ते वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता.
१. इयत्ता १ ते ५ पर्यंत हिंदी विषयाच्या पाठ्यपुस्तकांची प्रत्यक्ष छपाई झाली आहे की नाही?
२. शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये हिंदी भाषा शिकवली जाणार आहे की नाही?
मात्र, विभागाकडून प्राप्त झालेल्या उत्तरात केवळ इयत्ता १ साठी हिंदी पाठ्यपुस्तकाच्या तयारी विषयी निर्देश नमूद करण्यात आले आहेत. "छपाई केली जाईल" असे नमूद केले असले तरी ती प्रत्यक्षात झाली आहे की नाही याचा उल्लेख नाही. तसेच, संबंधित विषयाचे अनुषंगाने ५ मे रोजी पहिल्यांदा माहिती अधिकारात माहिती मागवलेल्या दिनांक पासून इयत्ता १ ते ५ साठी हिंदी शिकवण्यासंबंधी शासन निर्णय झाल्याचा कोणताही स्पष्ट उल्लेख आढळत नाही.
अशा परिस्थितीत, खालील माहिती लेखी स्वरूपात आणि स्पष्टपणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे:
इयत्ता १ ते ५ साठी हिंदी विषयाची पाठ्यपुस्तके प्रत्यक्षात छापण्यात आली आहेत का? (होय/नाही – छपाई दिनांक नमूद करून)
शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये इयत्ता १ ते ५ साठी हिंदी विषय शिकवण्याबाबत शासनाचा कोणता अधिकृत आदेश / निर्णय आहे?
ही माहिती लोकहितार्थ अत्यंत आवश्यक आहे, कारण राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (NEP 2020) अंमलबजावणीच्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम व साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर माहिती सुस्पष्ट, लेखी स्वरूपात आणि संदर्भासह उपलब्ध करून द्यावी, ही नम्र विनंती आहे.
आपण माझे म्हणणे ग्राह्य धरून योग्य व न्यायनिष्ठ निर्णय द्यावा, ही विनंती आहे.
इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल
- 1990 साली पुलाचे काम सुरु झालं
- 1993 साली हे पूल तयार झालं, तेंव्हापासून वापरात
- 2023 साली म्हणजे 30 वर्षानंतर हा पूल जीर्ण झाल्याचं निदर्शनास
- दीड वर्षांपासून हा कमकुवत पूल वापरास बंद
- नव्या पूल उभारणीसाठी 8 कोटींचा निधी
- सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर काढून वर्क ऑर्डर ही दिल्याचा प्रशासनाचा दावा
- प्रत्यक्षात कामाला पावसानंतर सुरुवात होण्याची शक्यता
मावळमधील कुंडमळाइथं पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. याचं रेस्क्यू ऑपरेशन काल रात्री 10 वाजता थांबविण्यात आलं, ते आज सकाळी 7 वाजता पुन्हा एकदा सुरु करण्याचं नियोजन प्रशासनाचं आहे. पण मध्यरात्रीपासून पावसाचा ठिपका थांबायचं नाव घेईना, याचा व्यत्यय आजच्या बचावकार्यात होणार आहे. हे आव्हान बचाव पथकं कसं पेलतात हे पाहणं महत्वाचं आहे. काल दुपार साडे तीन पासून रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे साडे सहा तास बचावकार्य सुरु होतं. 4 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं, तसेच 51 पर्यटक यातून बचावल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलंय. त्यानंतर कोणी सापडलं नाही, अशी तक्रार प्रशासनाकडे आलेली नाही. मात्र तरी ही खबरदारी म्हणून आज पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन राबवले जाणार आहे. सकाळी 7 वाजता हे रेस्क्यू सुरु केलं जाणार आहे, पण पावसाचं आव्हान बचावपथकांसमोर आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Rain Live : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, ठाणे-पालघरला मंगळवारी यलो अलर्ट