Kolhapur North By-Election Results 2022 : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी होत आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. कोल्हापूर उत्तरमधील (Kolhapur Election) पोटनिवडणुकीत करूणा शर्मा अपक्ष उमेदवार होत्या. एबीपी माझासोबत एक्सक्लुसिव मुलाखत देताना करुणा शर्मा यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. 


 


कॉंग्रेस, भाजपाकडून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप, निवडणुक रद्द करण्याची करुणा शर्मांची मागणी
10 तारखेला आचारसंहिता संपली असतानाही कॉंग्रेस आणि भाजपाने वृत्तपत्रात बातमी तसेच जाहीरात दिल्याचा आरोप करूणा शर्मांनी केला आहे. यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पैसे घेताना ताब्यात घेतले असल्याचे शर्मा यांनी एबीपी माझाच्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत सांगितले आहे. तसेच या दरम्यान 40 लाख रुपये खर्च केल्याचा आरोप देखील करूणा शर्मा यांनी केला आहे, या प्रकरणी निवडणुक आय़ोगात तक्रार नोंदवली असूनही त्यावर काहीच कारवाई न घेतल्यामुळे करुणा शर्मा यांनी आक्षेप नोंदवला आहे.


मी न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाणार


मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी शिवशक्ती या नवीन पक्षाची घोषणा केली होती. कोल्हापूर (Kolhapur) उत्तरची पोटनिवडणूक लढवणार असून स्वत: मैदानात उतरण्याचे जाहीर केले होते. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होते. दरम्यान, या निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे, जर निवडणुक रद्द झाली नाही. तर मी न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. माझ्याकडे या प्रकरणी पुरावा आहे, निवडणुक आयोगाकडे तक्रार करताना मी संबंधित वृत्तपत्रांची कात्रणं दिली आहे. निवडणुक आयोगाचे तसेच कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. यावर गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.