Satej Patil : भाजपनं कोल्हापुरात विखारी प्रचार केला. भाजपचे 61 आमदार इथे बसून होते, तर सात हजार कार्यकर्ते दिवसरात्र पचार करत होते. कोल्हापुरात लॉज, हॉटेल आणि मंगलकार्यलयही उपलब्ध नव्हते, इतकी लोकं बाहेरुन कोल्हापुरात आली आणि परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होती. पैशांचा वारेमाप वापर केला. कोल्हापुरात पैसे वाटताना भाजपचे कार्यकर्ते सापडले. प्रचंड साधन-सामुग्रीचा भाजपने कोल्हापुरात वापर केला. पण सुदैवाने कोल्हापूरकरांनी महाविकास आघाडीला कौल द्यायचा निर्णय घेतला. हा विजय आमचा नाही, कोल्हापूरकरांचा आहे, असे सजेत पाटील म्हणाले. कोल्हापूर पुरोगामी आहे, हे लोकांनी दाखवून दिले, असेही पाटील म्हणाले.


कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. समतेचा संदेश ज्यांनी जगाला दिला त्या कोल्हापुरात प्रचंड प्रमाणात ध्रुवीकरण करण्यात आले. काश्मीर फाईल चित्रपटाची 25 ते 30 हजार तिकिटं लोकांना देण्यात आली. पण आम्ही महागाईचा मुद्दा मांडला. भाजपला मिळालेली मतं फक्त त्यांची नाहीत. आरपीआय, जनसुराज्य, शिवसंग्राम आणि सदाभाऊ खोत यांची मते भाजपला मिळाली आहे. मग एक विरुद्ध तीन लढत कशी होईल? भाजपचा मतांचा टक्का वाढला, ती त्यांची एकट्याची मते नाहीत, असे गृहनिर्माण राज्य मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. ते एबीपी माझाशी बोलत होते.


कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव केल्यानंतर सतेज पाटील, गृहनिर्माण राज्य मंत्री यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. सात वर्षांपासून देशात भाजपची लाट आली असताना सजेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये काँग्रेसची सत्ता कायम ठेवली आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसला सतेज पाटील यांनी एकहाती विजय मिळवून दिला. यामागील यशावर प्रश्न विचारला असता सतेज पाटील म्हणाले, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांमध्ये राहून कामं करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच कोल्हापुरातील जनतेनं यश दिले. महाविकास आघाडीमध्ये सर्वांशी सलोख्यानं राहून या निवडणुका लढवल्या. त्यामुळेच लोकांनी कौल दिला. राजकारणातील विश्वासहर्ता अतिशय महत्वाची आहे. गोकुळची निवडणूक जिंकल्यानंतर दिलेल्या आश्वासनानंतर दुधाचे दर दोन रुपायांनी तात्काळ वाढले. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला आहे.  सत्तेचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.