जालना : महाराष्ट्राच्या मातीतली प्रसिद्ध महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला जालन्याच्या आझाद मैदानावर कालपासून सुरुवात झाली आहे. कालच्या दिवशी राज्य कुस्ती विजेतेपदासाठीच्या 57 आणि 79 किलो वजनी गटाच्या कुस्त्या खेळवण्यात आल्या. महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार आता चांगलाच रंगात आला असून राज्य विजेतेपदाच्या कुस्तीत पुण्याच्या सागर मारकडला माती विभागाचं तर मॅट विभागात आशिष वावरेला सुवर्णपदक मिळालं आहे.

सागर मारकडला 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक

महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सध्या जालन्याच्या आझाद मैदानावर सुरु आहे. या स्पर्धेत राज्य कुस्ती विजेतेपदाच्या लढतीत पुण्याच्या सागर मारकडने 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. सागरनं माती विभागात कोल्हापूरच्या संतोष हिरगुडेला पराभवाची धूळ चारली. सागरनं अंतिम लढतीत कोल्हापूरच्या संतोष हिरगुडेचा 10-0 असा धुव्वा उडवला.

सोलापूरच्या वेताळ शेळकेला 79 किलो वजनी गटाचं सुवर्णपदक

राज्य विजेतेपद कुस्तीत माती विभागात सोलापूरच्या वेताळ शेळकेनं 79 किलो वजनी गटाचं सुवर्णपदक पटकावलं. तर सोलापूरच्याच जोतिबा अटकळेनं मॅट विभागातल्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. वेताळ शेळकेनं अंतिम फेरीच्या लढतीत उस्मानाबादच्या हनुमंत पुरीला चीतपट केलं. तर जोतिबा अटकळेनं आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातला त्याचाच सहकारी साताऱ्याच्या प्रदीप सूळवर 4-1 अशी मात केली.

आशिष वावरेचं मॅट विभागात 79 किलो वजनी गटात सुवर्णपदक

सोलापूरच्या आशिष वावरेनं मॅट विभागातल्या 79 किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. आशिषनं पुण्याचा पैलवान अक्षय चोरगेचा 10-2 असा धुव्वा उडवला. आशीष वावरेनं गतवर्षी 74 किलो वजनी गटात तिसरं स्थान पटकावलं होतं. आशीष हा सोलापूरच्या माळशेज तालुक्यातील मोरोशी गावचा पैलवान आहे. तिथे तो वस्ताद महादेव ठोरेंच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं काल जालन्याच्या आझाद मैदानावर औपचारिक उद्धाटन करण्यात आलं. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, अभिनेता अरबाज खान गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्पर्धेचे संयोजक आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगेही उपस्थित होते. महाराष्ट्र केसरीसाठीच्या कुस्त्यांना उद्यापासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र केसरी किताबासाठी यंदाही माती आणि मॅटवरच्या अनेक मातब्बर पैलवानांमध्ये चुरस रंगणार आहे. त्यामुळे त्यानिमित्तानं मराठवाड्यातल्या क्रीडारसिकांना तुफानी कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे.