Maharashtra Kesari 2023: महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेसोबत मल्ल सिकंदर शेखची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सेमीफायनलमध्ये सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. राज्यभरात त्याच्या पाठीशी चाहते उभे ठाकलेत. यावर स्वतः सिकंदरने भाष्य केलंय. महाराष्ट्र केसरी चा प्रबळ दावेदार म्हणून सिकंदर शेखकडे ही अनेकांच्या नजरा होत्या. मात्र, सेमिफायनलमध्ये त्याच्यावर पंचांनी अन्याय केला, अशा आशयाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. उपकेसरी महेंद्र गायकवाड कडून सिकंदर ला पराभव स्वीकारावा लागला होता. पण या पराभवाचे शल्य असल्याचं सिकंदरने म्हटलं असून अन्याय झाल्याचं अप्रत्यक्षरीत्या म्हटलं आहे. मात्र कुस्तीचा प्रवास इथंच थांबलेला नसून पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेल, असा विश्वास ही त्याने व्यक्त केलाय. 


सोशल मीडियावर सिकंदर शेख याला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. अनेकांनी व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याशिवाय काहींनी कुस्तीचा नियम दाखवला आहे. पंचांनी चार गुण न दिल्याचं सोशल मीडियावर सांगितलं जात आहे. यामध्ये कुस्तीपटू अमोल बनकर याच्यासह अनेकांनी सिकंदर शेख याला पाठिंबा दर्शवला आहे. 


सोशल मीडियावर काय चर्चा?


महेंद्र गायकवाड व सिंकदर शेख यांच्या लढतीमध्ये अगदी जवळून घेतलेला हा व्हीडीओ व फोटो खांद्याकडून पाठीकडे 90 अंशांपेक्षा कमी पोझिशनमध्ये जर एखादा कुस्तीगीर आकाशामधून घुडगे न टेकता सरळ जमिनीवर पडला तेव्हा ती एक्शन ४ पॉईंटची होते. 



काय आहे प्रकार?


माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात उपांत्य सामना पार पडला होता. महेंद्र गायकवाडने दुसऱ्या फेरीत ४ गुण मिळवत सिकंदर शेखवर ५-४ अशी आघाडी घेतली पण महेंद्र गायकवाडने लावलेली बाहेरील डांग हा डाव ही व्यवस्थीत झाला नव्हता. मग सिकंदर चार गुण कशाचे दिले गेले? असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले होते. 


महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंच यांना धमकी


महाराष्ट्र केसरीत सिकंदर  शेख विरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना धमकी मिळाल्याचं समोर आले आहे. मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोन वरून धमकी दिल्याची माहिती आहे. फोन रेकॉर्डिग देखील समोर आली आहे. संग्राम कांबळे यांनी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांचा कुस्तीतील पंच मारुती सातव यांना फोन करून लाज काढली. धमकीनंतर सातव यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे तक्रार अर्ज केलाय. या तक्रारीचा अर्ज  संपूर्ण प्रकरणी  संदीप भोंडवे, महाराष्ट्र केसरी स्पर्धा समितीकडून कोथरूड पोलिसांकडे देण्यात आलाय.