Maharashtra Kesari 2023 : पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज झालेल्या लढतीत मॅट आणि माती विभागातून चार मल्लांनी महाराष्ट्र स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांनी आज अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत दोन्ही गटातील मल्ल एकमेकांशी लढून ‘महाराष्ट्र केसरी’ खिताबासाठी दावेदारी करणार आहेत.  


पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी आज झालेल्या लढतीत मॅट विभागातील पहिली उपांत्य लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने पुण्याच्या तुषार दुबे याचा पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत वाशीमच्या सिकंदर शेख याने बुलढाण्याच्या बालारफिक शेखचा पराभव करून माती विभागातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रवेश केला.  


गादी गटातील दुसऱ्या उपांत्य लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने पुण्याच्या गणेश जगताप याचा पराभव करुन अंतिम लढतीत धडक मारली. गादी विभागाची अंतिम लढत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात उद्या संध्याकाळी होणार आहे. या दोघांमधील विजेता महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत पोहचेल. तर माती विभागातील अंतीम लढत सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात होणार आहे. या दोघांमधील विजेता महाराष्ट्र केसरीतील अंतीम फेरीत पोहचेल. 


माती आणि गादी गटातून विजयी झालेल्या दोन्ही मल्लांची गादीवर महाराष्ट्र केसरीसाठी लढत होईल. संपूर्ण महाराष्ट्राचे या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे. उद्या संध्याकाळीच (14 जानेवारी) ही अंतिम लढत होणार आहे. 


गतवेजेत्या पृथ्वीराज पाटीलचा पराभव 


दरम्यान, दुपारी झालेल्या लढतील आज एक धक्कादायक निकाल लागलाय. मागील वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याचा पुण्याच्या हर्षद कोकाटेनं पराभव केल्याचं पाहायला मिळालं आहे. मागील वर्षी पृथ्वीराज पाटील यांने अत्यंत दमदार खेळ करत महारष्ट्र केसरीचा खिताब पटकावला होता. त्यामुळे यंदाही तो कमाल करतो का? हे पाहण्यासाठी सर्वांचं लक्ष्य त्याच्या कुस्तीकडे लागून होतं. अशात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पृथ्वीराज पाटील विरुद्ध हर्षद कोकाटे लढतीत आधीपासूनच हर्षद पृथ्वीराजवर भारी पडला. पण पृथ्वीराज पाटीलनंही कडवी झुंज देत आक्रमक खेळी केली.  मध्यंतरापूर्वी तीन गुण त्यानेही मिळवले. ज्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये 4-3 असा स्कोर होता आणि हर्षदने आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या राऊंडमध्ये हर्षद कोकाटेने आणखी दमदार खेळ दाखवत तीन गुण खिशात घातले. पृथ्वीराज पाटीलनेही पुन्हा झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण हर्षद कोकाटेने भक्कमपणे उभा राहत पृथ्वीराजला गुण मिळवण्याची संधी दिली नाही. ज्यानंतर अखेरीस 9-3 अशा दमदार आघाडीच्या जोरावर हर्षद कोकाटेनं विजय मिळवच मैदान मारलं.


महत्वाच्या बातम्या


Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उलटफेर, गतवर्षीच्या विजेत्या पृथ्वीराज पाटीलला पुण्याच्या हर्षद कोकाटेनं आस्मान दाखवलं