Maharashtra Kesari 2023 : पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील माती गटातील अंतिम लढतीबाबतचा वाद सुरू झालाय. पैलवान सिकंदर शेख (Sikander Sheikh) याच्यावर अन्याय झाल्याच्या भावना सोशल मीडियावरून व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणी आता सिकंदर शेख याच्या मोहोळ गावचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांनी गंभीर आरोप केला. "ज्या-ज्या वेळी पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते त्या -त्या वेळी दुजाभाव केला जातो. पुण्यात स्पर्धा झाल्यानंतर केवळ पुण्यातीलच स्पर्धक कसे विजयी होतील या पद्धतीने पाहिले जाते. आमचा आता कुस्तीगीर परिषदेवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता स्वतंत्र कुस्ती फेडरेशन स्थापन करून स्वतःच महाराष्ट्र केसरी भरवू. तेथे कोणत्याही पैलवानावर अन्याय होणार नाही, अशा भावना रमेश बारस्कर यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान सिकंदर शेख विरोधात चार गुण दिल्याचा आरोप पंच मारूती सातव यांच्यावर होतोय. पैलवान सिकंदर शेख याने देखील आपल्यावर अन्याय झाल्याचे शल्य बोलून दाखवले आहे. त्यानंतर आता रमेश बारस्कर यांनी सिकंदवर अन्याय झाला असून पुण्यात स्पर्धा भरली की पुण्यातीलच पैलवान विजयी केले जातात, असा आरोप केलाय.
सिकंदर शेख याच्या कुटुंबीयांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या मुलावर अन्याय झाला हे संपूर्ण महाराष्ट्रनं पाहिलं आहे. अतिशय कष्टाने मी त्याला वाढवलं, दोन रुपयांसाठी हमाली केली. आजारपणमुळं डोळा गेला त्यामुळं कुस्ती थांबली. सिकंदर महाराष्ट्र केसरी व्हावं इतकच माझं स्वप्न होतं. यंदाच्या वर्षी हे स्वप्न पूर्ण होतं, मात्र, त्याच्यावर अन्याय झाला. आखाड्यात जेव्हा पैलवान उतरतो त्यावेळी तो पंचासाठी मुलासारखा असतो, स्वतःचा मुलगा समजून पंचांनी निर्णय द्यावा, अशा भावना सिकंदर शेख याचे वडील पैलवान रशीद शेख यांनी व्यक्त केल्या आहेत. आम्ही स्वतः कुस्ती पाहत होतो, पंचांनी चुकीचा निर्णय दिला. माझ्या मुलावर अन्याय झाला, असं सिकंदर शेख याचे काका शफिक शेख यांनी म्हटलं आहे. याशिवाय सिकंदरची आई मुमताज शेख यांनी देखील सिकंदरवर अन्याय झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्यभरातून या प्रकरणावर बोलले जात असताना आता स्वत: सिकंदर शेख याने देखील आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. "माझ्यावर अन्याय झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय. पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापुरात आणणार. टांग मारताना ज्या नियमाने गुण द्यायला पाहिजे तसं झालं नाही. व्हिडीओ सर्व बाजुंनी पाहू दिला नाही. कोच यांनी दाद मागितली पण त्यांना देखील काही बोलू दिलं नाही. जिथ टांग लागली आहे तिथं पूर्णपणे टांग बसलेली नाही. पूर्ण पाठीवर न पडता मी एका खांद्यावर पडलोय. त्यामुळे महेंद्र गायकवाडची अॅक्शन होती म्हणून त्याला दोन गुण देणं अपेक्षित होतं आणि माझा कब्जा आहे म्हणून मला एक गुण देणं अपेक्षित होतं. परंतु, असं न होता पंचांनी महेंद्रला चार गुण दिले. त्यावेळी माझ्या कोच यांनी दाद मागितली. परंतु, त्यांना काही न बोलू देता तेथून परत पाठवलं. चॅलेंज सक्सेस झालं असं माझ्या कोचला सांगितलं. परंतु, चॅलेंज सक्सेस झालं असं सांगितलं जात असेल तर मग महेंद्रला चार गुण कसे दिले? शिवाय फक्त समोरचाच व्हिडीओ का दाखवला? मागील कॅमेऱ्याचा व्हिडीओ का दाखवला नाही. मी तशी मागणी देखील केली होती, असे सिकंदरने म्हटलं आहे.
कोण आहेत रमेश बारसकर?
रमेश बारसकर हे मोहोळचे माजी नगराध्यक्ष आहेत. शिवाय ते स्वत: देखील पैलवान होते. ते सिकंदरच्या कुस्तीला आणि खुराकीसाठी आर्थिक मदत करतात.
पाहा व्हिडीओ
महत्वाच्या बातम्या