कर्नाटकचे वकील पी पी राव यांनी आजारी असल्याचं पत्र कोर्टाला दिल्याने सोमवारी होणारी नियोजित सुनावणी पुढे ढकलली आहे.
सकाळीच कर्नाटकचे ज्येष्ठ वकील आजारी असल्याचं पत्र दिल्याने, सुनावणी पुढे जाणार हे निश्चित झाले होते. महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे दिल्लीत दाखल झाले होते. न्यायालयात वकील राजीव रामचंद्रन आणि अरविंद दातारसह महाराष्ट्राचे अन्य वकील हजर होते.
कागदपत्रे जमा करताना औपचारिक चर्चेवेळी केंद्र सरकारच्या वकिलांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतली. सीमाप्रश्नाची याचिका दाखल करण्यास खूप विलंब झाला असून महाराष्ट्राची याचिका रद्दबातल ठरवावी अशी मागणी केंद्र सरकारच्या वकिलांनी केली.
केंद्राचे वकील रणजित कुमार वारंवार महाराष्ट्र विरोधी भूमिका मांडत होते.
सप्टेंबर 2014 मध्ये तत्कालीन न्यायाधीश लोढा यांनी दावा सुप्रीम कोर्टात आहे असे मत व्यक्त करून, साक्षी पुरावे नोंदवण्यासाठी एक सदस्यीय समिती नियुक्त केली होती. त्यानंतर पुन्हा कर्नाटकने आक्षेप घेऊन अंतरिम अर्ज दाखल केला , यावर काल सुनावणी होणार होती, ती आता 9 ऑक्टोबरला होणार आहे.