जळगाव: सोशल मीडियातील एका क्लिपमुळे तब्बल 14 वर्षे बेपत्ता असलेले सुनिल भोई पुन्हा त्यांच्या घरी परतले आहे. याचा घरच्यांना इतका आनंद झाला की त्यांनी थेट मिरवणूकच काढली. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील ही घटना आहे. 


जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील सुनील भोई हे चौदा वर्षांपूर्वी बेपत्ता झाले होते. चौदा वर्षाच्या नंतर सोशल मीडियाच्या एका क्लिपमुळे ते तामिळनाडू राज्यात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांना जळगाव येथे आणण्यात आले. सुनील भोई घरी परत आल्याच्या आनंदात त्यांच्या कुटुंबाने ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली. या मिरवणुकीत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. 
 
पाचोरा शहरात राहणारे सुनील भोई हे 2008 साली अचानक गायब झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशिक्षित आणि काही गतिमंद असलेल्या सुनील भोई यांचा त्यांच्या कुटुंबाने आणि पोलिसांनी अनेक दिवस शोध घेतला. मात्र ते कुठेही सापडले नाही. 


काळाच्या ओघात त्यांचं कुटुंब त्यांना विसरले असताना चार दिवसांपूर्वी सुनील भोई हे तामिळनाडूमध्ये फिरत असल्याची आणि ते जळगाव-पाचोरा येथील असल्याची क्लिप सोशल मीडियावर वायरल झाली. ती क्लिप सुनील भोई यांच्या कुटुंबियांच्या हाती लागली.


या क्लिपचा आधार घेत भोई कुटुंबाने थेट तामिळनाडू गाठलं आणि सुनील भोई यांचा शोध घेतला. त्यांना विमानामधून बसून जळगावमध्ये आणलं. अतिशय मनमिळाऊ असलेले सुनील भोई हे कुटुंबात अतिशय लाडके होते. चौदा वर्षानंतर ते कुटुंबात परत आल्याने संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. भोई कुटुंबाने सुनील भोई येण्याचा आनंद साजरा करण्यासाठी पाचोरा शहरात त्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. भोई कुटुंबाने काढलेल्या या मिरवणुकीमधे पाचोरा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.


सुनील भोई काहीशे गतिमंद असल्याने ते चौदा वर्षांपूर्वी रेल्वेत बसून थेट तामिळनाडू पर्यंत पोहोचले होते. त्या ठिकाणी असलेली तमिळ भाषा त्यांना येत नव्हती आणि त्यांची मराठी त्या ठिकाणच्या लोकांना कळत नसल्याने रस्त्यावरच त्यांनी आपलं जगणं सुरू केलं. याच दरम्यान यवतमाळ येथील अभियंता अमोल गव्हाणे हे कामानिमित्ताने तामिळनाडू येथे गेले असता त्यांना ते मराठीत बोलताना आढळून आले. त्यांनी चौकशी केली असता आपण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील असल्याची माहिती गव्हाणे यांना दिली होती. अमोल गव्हाणे यांनी सुनील भोई यांची क्लिप तयार करून घेत जळगाव जिल्ह्याच्या विविध मित्रांना पाठवली. गव्हाणे यांच्या या प्रयत्नाला चांगलेच यश मिळाले आणि सुनील भोई आज चौदा वर्षानंतर त्यांच्या घरी पोहोचले.