मुंबई : राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णतेचा कहर सुरु आहे. मार्च महिन्यात दोन वेळा उष्णतेची लाट आली. पण एप्रिल महिन्यातही नागरिकांची उन्हापासून सुटका होणार नाही. कारण हवामान विभागाने एप्रिल महिन्याचा अंदाज जारी केला असून त्यानुसार महाराष्ट्र एप्रिल महिन्यात अधिक तापणार असल्याचं सांगितलं आहे.


येत्या महिन्यात महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे एप्रिलमध्ये अधिक तापणार आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागात तापमान सरासरी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 


कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची देखील शक्यता आहे, आणि त्याचंही प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. उन्हाळ्यात प्रशांत महासागरातील laNina इफेक्ट कायम असणार आहे तर हिंद महासागरात आयओडी न्युट्रल स्थितीत असेल. त्यामुळे येणारा मान्सून देखील चांगला राहण्याची चिन्ह आहे.


2-3 दिवसात कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ 
दरम्यान पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होणार आहे. अहमदनगर, जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेच्या अंदाजासोबतच सोलापूर, जालना, परभणी आणि हिंगोलीत देखील उष्मघाताची शक्यता आहे. 


मार्च महिन्यात अकोल्यात सर्वाधिक तापमान
राज्यातील सर्वाधिक तापमान असणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यात मार्च महिन्यातच 42 अंश सेल्सिअस' तापमान पोहोचलं आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्याने जगभरातील पहिल्या दहा उष्ण शहरांमध्ये स्थान मिळवलं आहे.


गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा : हवामन विभाग
राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुपारच्या वेळेमध्ये रस्त्यावरील नागरिकांची संख्या कमी झाली आहे. आवश्यक काम असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडावं, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.