Bhaskar Jadhav : राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यावर टीका करताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची जीभ घसरली आहे. भास्कर जाधव यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा घरगडी असा उल्लेख केला आहे. भगतसिंग कोशारी यांच्या महाराष्ट्राच्या विरोधातील वक्तव्याकवरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी संजय राऊत यांना अटक केल्याचीही टीका भास्कर जाधव यांनी यावेळी केली. ते चिपळूण येथे बोलत होते. जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत भास्कर जाधव बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. तसेच संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवरही टिपण्णी केली. संजय राऊतांचे त्यांनी कौतुक केले.
भास्कर जाधव यांनी राज्य सरकारच्या मंत्री मंडळाच्या विस्तारावर खोचक टिका केली. ते म्हणाले की, 'मंत्रिमंडळाचा विस्तार होऊच नये. त्याची गरजच नाही..आता लोकांना लोकशाही काय आहे, ते समजले. आता बिनखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचेच राबवतायत. म्हणून मंत्रीमंडळाचा विस्तार न होता भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम राबवला जावा अश्या माझ्या शुभेच्छा आहेत.'
आज केंद्रामध्ये असलेले सरकार सगळा इतिहास काढून बघा. पुऱ्या स्वतंत्र्याच्या लढ्यामध्ये यांचा एकही नेता नाही. उद्या 75 वे वर्षे अमृतमहोत्सवी वर्षे म्हणून देशाचे पंतप्रधान ते वर्षे साजरे करतील. भाषण सादर करतील. आज सगळीकडे त्यांच्या रॅल्या निघतायत, पण दु:ख आहे या सगळ्यामध्ये आमच्या संघटनेचा नेता, पक्षाचा नेता कोण? नाव काढव त्यांचा त्याचा फोटो कुठे लावावा? हे भारतीय जनता पार्टीकडे नाही, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.
यापुढील शिवसेनेची लढाई खुल्या मैदानात होईल. एकाने दुसऱ्या गिळावे, दुसऱ्याने तिसऱ्यास गिळावे हाच जगाचा न्याय खरा, हिच जगाची परंपरा..तू जपून टाक पाऊल जरा तू जपून टाक पाऊल जरा, असे जाधव म्हणाले. प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करताना भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्ष कसा वाचवणार ? असा सवाल भास्कर जाधवांनी केला. देशात भाजपची दडपशाही सुरू असल्याचाही आरोप भास्कर जाधवांनी केला.
भगतसिंग कोशारी यांच्या महाराष्ट्राच्या विरोधातील वक्तव्याकचे लोकांचे लक्ष वळवण्यासाठी संजय राऊत यांना अटक केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना संजय राऊत यांनी पत्र लिहिलं होतं. पाच ऑगस्टपर्यंत ईडीकडे त्यांनी वेळ मागितला होता. अधिवेशन संपल्यानंतर सात ऑगस्ट रोजी हजर राहतो, असं सांगितलं होतं. पण राऊतांच्या पत्राला कोणतंही उत्तर न देता, लोकसभेच अधिवेशन सुरू असताना संजय राऊत यांना ईडीने अटक केली, असा आरोप भास्कर जाधवांनी केला.