Shahu Maharaj : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडून बंडाळी राज्यात महाविकास आघाडी कोसळले. त्यानंतर भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटाच लावला आहे.
यामध्ये कोल्हापूरमधील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाच्या विकासकामाचाही समावेश आहे. त्यामुळे समस्त शाहू प्रेमी आणि कोल्हापूरकारांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. शाहुंच्या समाधीस्थळाला स्थगिती दिल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. समाधीस्थळाचा विकास निधी लवकरात लवकर वर्ग करावा यासाठी शिवसेनेच्या वतीने आज निधी संकलन आंदोलन करण्यात आले.
कोल्हापुरातील महाद्वार रोडवर झोळी घेऊन शिवसैनिकांनी पैसे जमा केले. तो निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. शिंदे सरकारकडून एक एप्रिल 2021 पासूनच्या सर्व मंजूर विकास कामांना स्थगिती दिली आहे. शाहूंच्या समाधीस्थळ सुशोभीकरणासाठी 9 कोटी 40 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली होती. याबाबत तत्कालिन पालकमंत्री सतेज पाटील यांनी माहिती दिली होती. सामाजिक न्याय विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला होता. स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
दुसऱ्या टप्प्यात कोणती कामे होणार आहेत?
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हाॅल नुतनीकरण, आर्ट गॅलरी, डाॅक्युमेंटरी दाखवण्याची सोय, दलितमित्र दादासाहेब शिर्क उद्यान कंपाऊंड संरक्षक भिंत, लँडस्केपिंग पार्किंग सुविधा, टाॅयलेट बांधणी आदी कामे होणार आहेत.