नांदेड : या वर्षीच्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात वारंवार झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. या बाधित शेतकर्‍यांना सरकारी मदत देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बाधित शेतकर्‍यांना ही अतिवृष्टीची मदत मिळावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रयत्न करुन जिल्ह्याला जास्तीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये पहिल्या व दुसरा टप्पा मिळून जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी तब्बल 566 कोटींची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.


या वर्षी नांदेड जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला. जिल्ह्यातील विविध भागात वारंवार झालेली अतिवृष्टी व त्यातून अनेक छोट्या-मोठ्या नद्या व नाल्यांना आलेला पूर, यामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यासोबतच अनेक गावांमध्ये घरांती पडझड झाली होती. जनावरांचे गोठे वाहून गेले होते. यात अनेक जनावरे दगावली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. या पार्श्वभूमीवर शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी होत होती.


शेतकर्‍यांचे झालेले नुकसान भरपाई करण्यासाठी शासनानी दोन हेक्टरच्या मर्यादित जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी दहा हजार तर बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी 25 हजार मदतीची घोषणा केली होती. नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण प्रयत्नशील होते. त्यासाठी महसूल स्तरावर वारंवार सर्व्हे करुन शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देऊन प्रयत्न केले.


या सर्व बाबींचा परिणाम म्हणून 9 नोव्हेंबर 2020 रोजी निघालेल्या शासन आदेशानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 284 कोटी तर 7 जानेवारी 2021 रोजी निघालेल्या नव्या आदेशानुसार दुसर्‍या टप्प्यात 282 कोटी असे एकूण 566 कोटी रक्कम मदत निधी म्हणून प्राप्त झाली आहे. या निधी वाटपाची प्रक्रिया जिल्हाधिकार्‍यांमार्फत सुरु झाली असून लवकरच ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळणारा नांदेड राज्यातील एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.