मुंबई : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकाणी सत्तांतर तर काही ठिकाणी राजकीय पक्षांनी आपला गड राखला आहे. तर अनेक ठिकाणी स्थानिक युती-आघाड्यांनी वर्चस्व कायम ठेवलं आहे. या सगळ्या धामधुमीत मनसेनेही आपलं अस्तित्त्व दाखवून दिलं आहे. ठाणे, बीड, बुलढाणा, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायत मनसेने आपल्या ताब्यात घेतली आहे. याशिवाय रत्नागिरीच्या नवशी ग्रामपंचायतीत मनसेने खातं उघडलं आहे. तर उस्मानाबादमधील जळकोट ग्रामपंचायतीत जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांचा विजय झाला आहे.


अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायतीत मनसेचा विजय
ग्रामपंचायत निवडणुकीतील स्थानिक पातळीवर युती आघाडी बनते. त्यामुळे राज्य किंवा केंद्रीय स्तरावर एकमेकांचे विरोधक असलेले पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र लढताना पाहायला मिळतात. अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने हातमिळवणी केली होती. मनसेने या युतीच्या पॅनलचा पराभव करत वर्चस्व प्रस्थापित केलं. सात जागांच्या या निवडणुकीत मनसेने चार जागांवर विजय मिळवला. नरेश गायकर, सुरेखा गायकर, रेश्मा गायकर आणि जयश्री गायकर अशी या विजयी उमेदवारांची नावं आहेत.






केजच्या नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा
बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने झेंडा फडकावला आहे. या ग्रामपंचायतीमधील सात पैकी पाच जागांवर मनसेच्या सदस्यांचा विजय झाला आहे.


पाथर्डीतील शिरसाठवाडी ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटाने खातं घडललं आहे. शिरसाठवाडी ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात गेली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 9 जागा होत्या. या सर्व जागा मनसेच्या अविनाश पालवे पॅनेलने जिंकल्या आहेत.


बुलढाण्यात 25 वर्षांच्या शिवसेनेच्या सत्तेला मनसेकडून ब्रेक
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव ग्रामपंचायतीमध्ये मनसेचा मोठा विजय झाला आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी जिगाव ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात आली आहे. नऊपैकी सात जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. मनसे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर यांचा हा मोठा विजय आहे.


दापोलीतील नवशी ग्रामपंचायतीत मनसेने खातं उघडलं
दुसरीकडे रत्नागिरीच्या दापोलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खातं उघडलं आहे. नवशी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले यांचा विजय झाला आहे.


उस्मानाबादमध्ये मनसेच्या तीन पैकी दोन जिल्हाध्यक्षांना मतदारांनी नाकारलं
उस्मानाबादमध्ये मनसेचे तीन जिल्हाध्यक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. त्यापैकी दोन जणांना ग्रामस्थांनी नाकारलं आहे. इंदापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, तांदुळवाडीतील आबासाहेब ढवळे यांचा पराभव झाला. तर जळकोटमध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांचा विजय झाला.


राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक
15 तारखेला मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी एकूण 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर 2 लाख 41 हजार 598 उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी 26 हजार 718 उमेदवार बिनिविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: 2 लाख 14 हजार 880 उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले.


ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.