नवी दिल्ली : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग लवकरच तारीख जाहीर करणार आहे.

दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी 8 जूनला मतदान होणार होतं. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या चारही निवृत्त होणाऱ्या विद्यमान विधानपरिषद सदस्यांची मुदत 7 जुलै 2018 रोजी संपत आहेत.

मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी मे महिन्याच्या सुट्टीत लागलेल्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.



8 जून रोजी निवडणूक झाल्यास सुट्टीसाठी बाहेरगावी गेलेले मतदार मतदानापासून वंचित राहतील, असा दावा पाटील यांनी केला होता. शिवाय शाळा 15 जून आणि 18 जून रोजी सुरु होत असून त्याआधी 8 जून रोजी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदारांना परत येणं निव्वळ अशक्य आहे, असंही म्हटलं होतं.

त्यामुळे आता निवडणूक आयोगाने कपिल पाटील यांच्या मागणीची दखल घेत निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.