मुंबई : खासगी क्षेत्रातील नामांकित अॅक्सिस बँकेला फटका बसण्याची शक्यता आहे. नव्या सरकारने बँकेतील महाराष्ट्र पोलिसांचे सॅलरी अकाऊंट्स राष्ट्रीयकृत बॅकेकडे वळवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस खात्यातील 2 लाख कर्मचाऱ्यांची सॅलरी अकाऊंट अॅक्सिस बँकेत आहेत. पोलिसांच्या खात्यातून अॅक्सिस बँकेत वर्षाला 11 हजार कोटींची उलाढाल होते. मात्र हे पोलीस खातेदार अॅक्सिस बँकेला गमवावे लागू शकतात, अशी माहिती मुंबई मिरर वृत्तपत्रात छापून आली आहे.


ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर या हालचाली सुरु झाल्या आहे. विद्यमान सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. शिवसेनेनेच मुखपत्र सामनाच्या बातमीनुसार नव्या ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 30 डिसेंबरला होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर ठाकरे सरकार अॅक्सिस बँकेतून पोलिसांची खाती वळवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.


माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत उप-संचालक पदावर कार्यरत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करुन पोलिसांचे सॅलरी अकाऊंट्स अॅक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते मोहनिश जबलपुरे यांनी केला आहे. यासंबंधीची तक्रारही त्यांनी ईडीकडे दाखल केली होती.