मुंबई/नागपूर: महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नागपुरातील स्मारकाला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे.


हेडगेवार यांचं स्मारक स्मृती मंदिर म्हणून ओळखलं जातं. उजव्या विचारसरणीची संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतंच स्मृती मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याची अधिसूचना जारी केली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या स्मारकाला पर्यटनाचा दर्जा देण्याची शिफारस केली होती. ती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली.

रेशीमबागेतील स्मृती मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागपूर भाजपचे उपाध्यक्ष भुषण दावडे यांनी गेल्या वर्षी केली होती. जिल्हा नियोजन आयोगाने या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता.

डॉ. हेडगेवार यांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. डॉ हेडगेवार यांचं 21 जून 1940 रोजी निधन झालं. त्यांची अंत्ययात्रा रेशीमबाग येथून सुरु झाली होती. त्यामुळे रेशीमबाग हे संघ स्वयंसेवकांसाठी पूजनीय आहे.

दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने स्मृती मंदिराचा ‘नागपूर दर्शन’ यादीत समावेश केला आहे.

यापूर्वी नागपूर महापालिकेने स्मृती भवन आणि बाळासाहेब देवरा पथ त्रिवेणी स्मारक, गांधीबागाच्या विकासकामांसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.