मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, यासाठी आता दुधाची भुकटी बनवणाऱ्या संस्थांना प्रति लीटर तीन रुपये अनुदान मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तीन टक्के अनुदानाचा लाभ 14 खासगी तर 6 सहकारी संस्थांना मिळणार आहे.

दूधाला 10 मे पर्यंत योग्य भाव मिळाला नाही, तर आंदोलन करु, असा इशारा किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला होता. त्यानंतर आता दुधाला भाव मिळावा म्हणून सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत.

राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचे उत्पादन झालेले आहे. याच काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय  बाजारात दूध भुकटीचे दरही घसरलेले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरलेल्या दूध भुकटीच्या दरामुळे दूध भुकटी प्रकल्पधारकांचा कल कमी दूध भुकटी तयार करण्याकडे असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत दूध भुकटी प्रकल्पधारक दूध भुकटी निर्मितीकरीता शेतकऱ्यांकडून कमी दराने दूध खरेदी करतात. याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होतो, असं पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर म्हणाले.

दूध भुकटी प्रकल्पधारकांना प्रति लिटर दूध रुपांतरणासाठी 3 रुपये इतके अनुदान दिल्यास खाजगी व सहकारी दूध उत्पादकांमार्फत सद्य:स्थितीत रुपांतरीत करण्यात येणाऱ्या प्रति दिन अंदाजे 36 लाख 41 हजार लिटर दुधासाठी 1 कोटी 9 लाख 23 हजार रुपये इतके अनुदान दररोज सरकारकडून दिले जाणार आहे.

संपूर्ण 30 दिवसाचा कालावधी लक्षात घेता, अंदाजे 32 कोटी  76 लाख रुपये इतके अनुदान शासनामार्फत प्रोत्साहनपर अनुदान म्हणून दिले जाणार आहे. दूध भुकटी प्रकल्पधारकांना मार्च 2018 मध्ये त्यांनी उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान 20 टक्केअधिक दूध भुकटीचे उत्पादन केल्यावर याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या दूध खरेदीवर होणार असल्याचंही जानकर यांनी सांगितलं.