मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता महिना होईल, परंतु सत्ता स्थापनेचं घोंगडं भिजतच पडलं आहे. मात्र निकालापासून आजपर्यंत शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेत आहेत. तसंच ट्विटरच्या माध्यमातून राज्यातील सद्यस्थिती आणि सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने विविध कवी, शायर यांच्या कविता आणि शेर पोस्ट करत आहेत. त्यातच राऊतांनी केलेल्या एका ट्वीटला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी राहत इंदौरी यांच्या शायरीने रिप्लाय केला आहे.


संजय राऊत यांनी काल (19 नोव्हेंबर) उर्दू शायर हबीब जालिब यांचा शेर ट्विटरवर पोस्ट केला होता. "तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था, उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था, अशा या ओळी होत्या. राऊत यांच्या याच ट्वीटला नवाब मलिक यांनी राहत इंदौरी यांच्या शेरने रिप्लाय केला आहे. ते लिहितात, "जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे, किराएदार हैं ज़ाती मकान थोड़ी है"


सत्ता स्थापनेचा तिढा 2 ते 3 दिवसात सुटणार?
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा येत्या दोन ते तीन दिवसात सुटण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीला शरद पवार मात्र उपस्थित राहणार नाहीत. मात्र दोन ते तीन दिवसात महाशिवआघाडीबाबत मोठा निर्णय अपेक्षित असल्याचं कळतं.

शिवसेनेचा सन्मान टिकवणं आमची जबाबदारी : नवाब मलिक
शिवसेनेचा सन्मान टिकवून ठेवणे ही आमची जबाबदारी आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं आहे.
"तीन पक्ष एकत्रित आल्याशिवाय राष्ट्रपती राजवट हटणार नाही. तो निर्णय करण्यासाठीच उद्याची चर्चा आहे. शिवसेनेचा सन्मान टिकवून ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्रीपदावरुन आमच्यात भांडणे होणार नाहीत," असं नवाब मलिक म्हणाले होते.

25 तारखेच्या आसपास शपथविधी : अब्दुल सत्तार
गेल्या 26 दिवसांपासून सुरु असलेला सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. कारण, येत्या 25 तारखेच्या आसपास महाशिवआघाडीच्या सरकारचा शपथविधी होईल, असा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या खास मुलाखतीत सत्तार यांनी हे भाकित वर्तवलं आहे.